IND vs ENG 3rd Test : राजकोटच्या मैदानावर (IND vs ENG Rajkot Test) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. कोणी अपेक्षाही केली नसेल अशा फरकाने टीम इंडियाने इंग्लंडचा धूळ चारली. यशस्वी जयस्वालची आक्रमक फटकेबाजी आणि रविंद्र जडेजाचा भेदक मारा यामुळे टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवता आला आहे. अशातच आता राजकोटमधील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) रडीचा डाव खेळत असल्याचं पहायला मिळतंय. बेन स्टोक्सने डीआरएसमधील अंपायर्स कॉलवरच प्रश्नचिन्ह (Umpires Call Controversy) उपस्थित केल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर अंपायर्स कॉल काढून टाकायला हवा, असं मत देखील बेन स्टोक्सने व्यक्त केलं आहे.
नेमकं काय झालं?
झालं असं की इंग्लंडच्या दुसऱ्या डावात झॅक क्राऊली ज्या पद्धतीने बाद झाला. त्यावरून मोठा वाद उभा राहिला होता. दुसऱ्या डावात जेव्हा झॅक क्राऊली एलबीडब्ल्यू बाद झाला, तेव्हा इंग्लंडने थर्ड अंपायर्सची मदत घेतली. मात्र, थर्ड अंपायर्सने देखील अंपायर्स कॉल सांगून आऊट घोषित केलं. त्यामुळे बेन स्टोक्स चांगलाच नाराज झाल्याचं दिसून आलंय. अंपायर्स कॉलमध्ये बॉल स्टंप्सला लागला देखील नव्हता, परंतू अंपायर्स कॉल दिल्याने झॅक क्राऊलीला मैदान सोडावं लागलं. त्यावेळी देखील बेन स्टोक्सने ड्रेसिंग रुममधून नाराजी व्यक्त केली होती.
बेन स्टोक्स म्हणतो?
सामना संपल्यानंतर बेन स्टोक्सने याच मुद्द्यावर भाष्य केलं अन् स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. झॅक क्रॉऊलीच्या डीआरएसबाबत आम्हाला काही स्पष्टता हवी होती. बॉल स्टंप्सच्या बाहेर जात असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. मात्र, आम्हाला वाटत होतं की डीआरएसमधून आम्हाला समाधान मिळेल. मात्र, तसं झालं नाही. याचा अर्थ मला माहित नाहीये, पण काहीतरी चूक झाली हे नक्की. मी दोष देतोय असं नाही. पण हे काय चालले आहे? असा सवाल बेन स्टोक्सने विचारला आहे. मला वैयक्तिक वाटतं की अंपायर्स कॉल नियम काढून टाकला पाहिजे. जर बॉल हिट होत असेल तर आऊट द्या आणि होत नसेल तर नॉट आऊट दिलं पाहिजे, असं मत बेन स्टोक्सने मांडलं आहे.
अंपायर्स कॉल कधी दिला जातो?
एखाद्या फलंदाजाविरुद्ध दर एलबीडब्ल्यूची अपिल झाली अन् ग्राऊंड अंपायरने आऊट दिलं तर फलंदाज डीआरएस कॉल घेऊ शकतो. डीआरएसमध्ये जर बॉल स्टंप्सच्या लाईनमध्ये असेल आणि स्टंप्सला हिट होत असेल तर बाद दिला जातो. पण जेव्हा डीआरएसमध्ये तांत्रिक एररमुळे स्पष्ट मत तयार होत नाही, तेव्हा अंपायर्स कॉल म्हणजेच ग्राऊंड अंपायरचा कॉल अंतिम मानला जातो.