मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे मॅचसाठी एमएस धोनीला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला. धोनीच्या विश्रांतीनंतर चौथ्या वनडमध्ये भारतीय टीम गडगडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. धोनी हा भारतीय टीमचा अर्धा कर्णधार आहे. धोनीशिवाय कोहली अस्वस्थ होतो, असं वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी केलं आहे. धोनीला आराम देण्यावरही बेदी यांनी प्रतिक्रिया दिली. 'यावर टिप्पणी करणारा मी कोण आहे? पण धोनीला आराम देण्यात आल्यामुळे मी हैराण झालो होतो. चौथ्या वनडेमध्ये विकेटच्या मागे, बॅटिंग आणि फिल्डिंग करताना त्याची अनुपस्थिती जाणवली. धोनी हा भारतीय टीमचा अर्धा कर्णधार आहे.'
'धोनी आता युवा खेळाडू नाही, तसंच तो पूर्वीसारखा तंदुरुस्तही नाही, पण टीमला त्याची गरज आहे. धोनी असताना भारतीय टीम डोकं शांत ठेवून खेळते. कर्णधारालाही त्याची गरज पडते. हा चांगला संकेत नाही,' असं बेदी म्हणाले.
'वर्ल्ड कपआधी भारतीय टीमसोबत प्रयोग करायला नको होते. तुम्ही वर्तमानात खेळलं पाहिजे. वर्ल्ड कपला अजूनही अडीच महिने बाकी आहेत. तुम्ही फक्त तुमचा खेळ खेळा. वर्ल्ड कपसाठी आपण मागच्या अडीच महिन्यांपासून प्रयत्न करतोय. याबद्दल मी खुश नाही,' असं वक्तव्य बेदी यांनी केलं.
२३ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल वर्ल्ड कपआधी भारतीय टीमसाठी गंभीर समस्या निर्माण करु शकते. आयपीएलदरम्यान भारतीय खेळाडू जखमी होऊ शकतो, अशी चिंता बेदी यांनी व्यक्त केली. त्यांच्या फ्रेंचायजीसोबत खेळताना खेळाडू १०० टक्के देणार नाहीत, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही, असं बेदी म्हणाले.