border gavaskar trophy 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू आहे. सध्या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्यात आतापर्यंत टीम इंडियाची पकड मजबूत दिसत आहे. या सगळ्या दरम्यान या मालिका संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामनाच्या ठिकाणात बदल होऊ शकतो. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील स्टेडियमवर होणार आहे. मात्र, या मैदानावर होणारा सामना अन्य मैदानावर हलवला जाऊ शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात आहे. तर दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तिसरी कसोटी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते. या मैदानावरील शेवटचा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 मध्ये खेळला गेला होता.
वाचा: मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांच्याबाबत Salman Khan ने घेतला मोठा निर्णय!
तसेच गेल्या महिनाभरापासून स्टेडियममध्ये आऊटफिल्डचे काम सुरू होते, परंतु अद्याप ते पूर्णपणे तयार झालेले नाही. पुढील 1 ते 2 दिवसांत मैदानाची पाहणी केल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सदस्य येथे सामना आयोजित करायचा की नाही याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच या मैदानावरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात गेल्या महिन्यात खेळला गेला होता. तो टी-20 सामना होता. यानंतर, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मैदानात नवीन ड्रेनेज सिस्टम बसवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे संपूर्ण आऊटफिल्डची दुरुस्ती करावी लागली. त्याचवेळी, पावसामुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. त्यामुळे आता या मैदानावर होणारा सामना अन्य मैदानावर खेळवला जाऊ शकतो.
12 फेब्रुवारी रोजी बीसीसीआय मॉनिटरिंग कमिटीचे सदस्य मैदानाची पाहणी करून या कसोटी सामन्याच्या आयोजनाबाबत निर्णय घेतील. दुसरीकडे, सामना येथून हलवण्याचा निर्णय घेतल्यास बीसीसीआयने यासाठी बॅकअप म्हणून 4 मैदाने निवडली आहेत, ज्यात विशाखापट्टणम, राजकोट, पुणे आणि इंदूरचा समावेश आहे.