बीसीसीआयकडून बुमराहचा खास सन्मान, दोन पुरस्कारांनी गौरव

भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचा बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला आहे.

Updated: Jan 13, 2020, 12:20 PM IST
बीसीसीआयकडून बुमराहचा खास सन्मान, दोन पुरस्कारांनी गौरव title=

मुंबई : भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचा बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून बुमराहला २०१८-१९ सालचा पॉली उमरीगर पुरस्कार आणि २०१८-१९मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल दिलीप सरदेसाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

बुमराह हा सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत जगातला पहिल्या क्रमांकाच बॉलर आहे. जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात एका इनिंगमध्ये ५ विकेट घेणारा बुमराह आशिया खंडातला पहिला बॉलर ठरला.

२६ वर्षांच्या बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये ६२ आणि वनडेमध्ये १०३ विकेट घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह ऑगस्ट महिन्यापासून टीमबाहेर होता.

बुमराहशिवाय नुकत्याच अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या लेग स्पिनर पूनम यादवला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. माजी कर्णधार के.श्रीकांत यांना कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानं आणि अंजुम चोप्राला बीसीसीआय जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

चेतेश्वर पुजाराला २०१८-१९ या वर्षात सर्वाधिक टेस्ट रन केल्यामुळे दिलीप सरदेसाई पुरस्कार देण्यात आला. पुजाराने ८ टेस्ट मॅचमध्ये ५२.०७ च्या सरासरीने ६७७ रन केले.

भारताचा नवा टेस्ट ओपनर मयंक अग्रवालला सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. मयंकने मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध द्विशतकं केली होती. याच श्रेणीमध्ये शेफाली वर्माचाही गौरव करण्यात आला. मयंकने ९ टेस्ट मॅचमध्ये ६७.०७ च्या सरासरीने ८७२ रन केले, यामध्ये ३ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे दुसरीकडे शेफालीने ९ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये २२२ रन केले आहेत.