कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी-चिंचवड: कॅप्टन कूल धोनी IPL 2021 स्थगित झाल्यामुळे सध्या रांचीमध्ये आपल्या कुटुंबासोबत आणि प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे. याच दरम्यान चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने पिंपरी चिंचवडकरांची छाती अभिमानाने फुलणार आहे. याचं कारण म्हणजे धोनीने चक्क पिंपरी चिंचवड परिसरात नवीन घरं घेतलं आहे.
रांचीहून थेट धोनीनं पुण्यात घर घेण्याचा निर्णय घेतला. धोनीला पिंपरी-चिंचवड परिसरातील घर घेतलेल्या ठिकाणचं वातावरण आवडलं आणि त्याने घर घेण्याचं निश्चित केलं.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला तसंही अनेक वेळा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अथवा आयपीएल मॅच खेळण्यासाठी संघासोबत पुण्यातील गहुंजे स्टेडियमला यावं लागायचं. गहुंजे स्टेडियम परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहून धोनी प्रभावित झाला आणि त्यांनी या परिसरात घर घेतलं अशीही एक चर्चा आहे.
कोणत्याही मॅचसाठी पुण्यात यायचं झाल्यास धोनी आपल्या घरी मुक्कामाला येत असे. एस्टाडो प्रेसिडेंशियल असे या सोसायटीचे नाव आहे जिथे धोनीने आपला फ्लॅट घेतला आहे आणि पुण्यात दौरा असेल तर तो याच घरात येऊन राहाणं पसंत करतो.
धोनीला काही वेळा नेट प्रॅक्टिस करताना आणि सकाळी 5 वाजता जॉगिंग करताना पाहिल्याचं तिथल्या काही रहिवाशांनी सांगितलं आहे. धोनी सध्या आपल्या रांचीच्या घरी आहे. तिथे आपल्या कुटुंबासोबत तो वेळ घालवत आहे. धोनीची पत्नी साक्षीने त्याचे प्राण्यांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.