मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा खराब फॉममध्ये होता. या सिझनमध्ये रोहितची बॅट पूर्णपणे शांत होती. मुंबई इंडियन्सकडून तो एक मोठी खेळी किंवा चांगली ओपनिंग करण्यासाठी अपयशी ठरला. यावरून रोहित शर्मावर टीका करण्यात आली. मात्र त्याच्या फॉर्मवर आता त्याने स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कबूल केलंय की, गेले काही दिवस त्याची फलंदाजी चांगली होत नाहीये. शनिवारी सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, 'अनेक गोष्टी ज्या मला करायच्या होत्या, त्या मी करू शकलो नाही. या सिझनमध्ये माझ्या कामगिरीने मी खूप निराश आहे. पण माझ्यासोबत याआधीही असं घडलंय आहे, त्यामुळे मी पहिल्यांदाच यातून जातोय असं नाही.
रोहित शर्मानेही फॉर्ममध्ये परत येण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. रोहित शर्मा म्हणाला, 'मला माहित आहे की क्रिकेट इथेच संपत नाही, आपल्याला पुढे खूप क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे मला मानसिक पैलूवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे.
मी फॉर्ममध्ये कसं कमबॅक करू शकेन आणि चांगली कामगिरी कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. यासाठी थोडे बदल करावे लागतील आणि मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यावर काम करण्याचा प्रयत्न करेन, असंही रोहित म्हणालाय.