close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

BCCIच्या ३९व्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी सौरव गांगुली सज्ज

सर्वात अनुभवी  अध्यक्षाच्या निर्णयांकडे सर्वांचं लक्ष... 

Updated: Oct 23, 2019, 08:05 AM IST
BCCIच्या ३९व्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी सौरव गांगुली सज्ज

मुंबई : भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंतच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असणारा सौरव गांगुली बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहे. सौरव हा बीसीसीआयचा ३९वा अध्यक्ष ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयचा कारभार जवळपास बऱ्याच महिन्यांसाठी सांभाळला होता. ज्यानंतर आता या समितीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गांगुली अध्यक्षपदी विराजमान होत आहे. 

बीसीसीआयच्या अध्यपदी गांगुलीची निवड ही सर्वानुमते करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय, सचिवपदी असणार आहे. तर, उत्तराखंडचे महिम वर्मा हे उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 

अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल हे खजिनदारपदी असणार आहेत. तर, केरळचे जयेश जॉर्ज हे संयुक्त सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील. अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या गांगुलीचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांसाठीच असणार आहे. जुलै महिन्यात त्याला हे पद सोडावं लागेल. नव्या संवैधानिक तरतुदींनुसार कोणताही खेळाडू सलग सहा वर्षांपर्यंतच क्रिकेट बोर्डाचं पद भूषवू शकतो. गेल्या पाच वर्षे आणि दोन महिन्यांपासून तो बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहे. त्यामुळे त्याचा बीसीसीआयच्या अक्षध्यपदाचा कार्यकाळ हा काही महिन्यांचाच असेल. 

दांडगा अनुभव असणारा पहिला अध्यक्ष 

गांगुली बीसीसीआयचा असा पहिला अध्यक्ष असेल ज्याच्याकडे क्रिकेटच्या मैदानाचा दांडगा अनुभव आहे. जवळपास चारशेहून जास्त क्रिकेट सामने खेळणारा तो पहिलाच अध्यक्ष ठरत आहे. त्याच्याआधी १९५४ ते १९५६ पर्यंत तीन कसोटी सामने खेळणारे विजयनगरमचे महाराजा विजय आनंद गणपती राजू हे बीसीसीआयच्या अनुभवी अध्यक्षांपैकी एक आहेत. 

२३३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारे सुनील गावस्कर आणि ३४ सामन्यांचा अनुभव असणारे शिवलाल यादव यांनीही क्रिकेट बोर्डाचं नेतृत्व केलं होतं. पण, ते दोघंही काही काळासाठीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते.