धोनीबाबत गांगुलीशी चर्चा झाली का? विराटनं दिलं हे उत्तर

२३ ऑक्टोबर म्हणजेच उद्या सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे.

Updated: Oct 22, 2019, 06:17 PM IST
धोनीबाबत गांगुलीशी चर्चा झाली का? विराटनं दिलं हे उत्तर title=

रांची : २३ ऑक्टोबर म्हणजेच उद्या सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. त्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीला धोनीच्या भवितव्याबाबत गांगुलीशी चर्चा झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा याबाबत गांगुलीशी कोणतीच बातचित झाली नसल्याचं कोहलीने सांगितलं.

रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहली बोलत होता. मूळचा रांचीचा असलेला धोनी मॅच संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटायला आला होता. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेला धोनी बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमध्येही खेळण्याची शक्यता कमी आहे.

धोनीच्या भवितव्याबाबत निवड समितीशी बोलू असं, बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं निश्चित झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये गांगुली म्हणाला होता.

अध्यक्ष झाल्याबद्दल मी गांगुलीचं अभिनंदन केलं. गांगुली अध्यक्ष झाला हे खूप चांगलं झालं. पण धोनीबाबत माझी आणि त्याची चर्चा झाली नाही. गांगुलीला जेव्हा माझ्याशी बोलायचं असेल, तेव्हा तो नक्कीच बोलेल. तो मला भेटायला बोलवेल तेव्हा मी जाईन, असं वक्तव्य विराटने केलं आहे. 

२४ ऑक्टोबरला गांगुली कोहलीची भेट घेणार आहे. पण ही भेट फक्त बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून असेल. बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमध्ये विश्रांती घ्यायची का नाही, याचा निर्णय विराट स्वत: घेईल, असं गांगुलीने सांगितलं.

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडने पराभव केला होता. यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौरा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून धोनीने माघार घेतली. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी धोनी लष्कराची सेवा करायला गेला होता.