हिसार : रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅटदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे युवराज सिंग चांगलाच अडचणीत आला आहे. या चॅटमध्ये युवराज सिंगने युझवेंद्र चहलबाबत जातीवाचक वक्तव्य केलं होतं. यावरून आता युवराजविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिसारच्या हांसीमध्ये दलित अधिकार कार्यकर्ते आणि वकिल रजत कलसन यांनी युवराजविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे.
युवराज सिंगने माफी मागण्याबाबतचा हॅशटॅग आधीच ट्विटरला ट्रेन्डिंगमध्ये आहे. तक्रारदार रजत कलसन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रोहित शर्मावरही निशाणा साधला आहे. युवराजच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्माने त्याला समज द्यायला हवी होती, तसंच त्याचा विरोध केला पाहिजे होता, पण रोहितने हसून युवराजचं समर्थनच केलं. यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या, अशी प्रतिक्रिया कलसन यांनी दिली आहे.
Yuvraj said 'bhangi' to chahal in live with rohit sharma
The word Yuvraj used for chahal was wrong.
So people trend #युवराज_सिंह_माफी_मांगोpic.twitter.com/Qxi8Y7q8HQ
— naman (@iamns3010) June 1, 2020
रजत कलसन यांनी युवराज सिंगला अटक करण्याची मागणीही केली आहे. तसंच त्यांनी युवराजच्या वक्तव्याची सीडी आणि कागदपत्रही सोपवली आहेत. याप्रकरणाचा तपास डीएसपी सीटीला सोपवण्यात आल्याची माहिती हांसीचे एसपी लोकेंद्र सिंग यांनी दिली आहे.
युझवेंद्र चहलने त्याच्या वडिलांसोबत टिकटॉकवर एक व्हिडिओ टाकला. या व्हिडिओवरून रोहित शर्मा आणि युवराज सिंग चहलची मस्करी करत होते. हे सुरू असतानाच युवराजने चहलबाबत जातीवाचक उल्लेख केला. यानंतर युवराज सिंगने माफी मागावी ही मागणी ट्विटरवर जोर धरू लागली.
काहीच दिवसांपूर्वी कोरोनाशी सामना करण्यासाठी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करा, असं आवाहन युवराजने केलं होतं. यानंतरही युवराजवर टीका करण्यात आली होती. या टीकेनंतर युवराजने शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचं समर्थनही केलं होतं. पण शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान मोदी आणि काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मात्र युवराजने चूक झाल्याचं मान्य केलं होतं.