Video: Shubman Gill ने स्वीकारलं त्या मुलीचं प्रपोजल! या 'लव्हस्टोरी'चं नागपूर कनेक्शन चर्चेत

Shubman Gill Accepted Tinder Proposal By Girl: शुभमनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओची त्याच्या सहकाऱ्यांमध्येही चर्चा असून अगदी उमेश यादव पासून अर्शदीप सिंगनेही यावर कमेंट केली आहे.

Updated: Feb 4, 2023, 10:08 PM IST
Video: Shubman Gill ने स्वीकारलं त्या मुलीचं प्रपोजल! या 'लव्हस्टोरी'चं नागपूर कनेक्शन चर्चेत
Cricket Shubman Gill

Shubman Gill Accepted Tinder Proposal By Girl: टीम इंडियाचा युवा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) मैदानामधील कामगिरीमुळे चर्चेत आहे. आपल्या तुफान फटकेबाजीने त्याने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 (Ind vs Nz T20) सामन्यामध्ये शुभमनने दमदार शतकी खेळी केली. 63 चेंडूंमध्ये 126 धावांची खेळी केलेल्या शुभमनवर कौतुकाचा वर्षाव होत अशतानाच एका मुलीने मैदानामध्येच शुभमनला प्रपोज (Shubman Gill Proposed by Girl) केलं. मात्र आता शुभमनने या मुलीचं हे प्रपोजल स्वीकारलं आहे. 

ही मुलगी कोण?

खरं तर न्यूझीलंडविरुद्धच्या समान्यादरम्यान प्रेक्षकांमधील एका मुलीने हातात शुभमनसंदर्भातील पोस्टर पकडलं होतं. यावर डेटिंग अ‍ॅप असलेल्या 'टिंडर'चा (Tinder) उल्लेख होता. 'टिंडर शुभमनबरोबर मॅच करुन दे' असं बॅनर पकडलेली एक तरुणी सामन्यादरम्यान कॅमेरात कैद झाली. या तरुणीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शुभमनला प्रपोज करणाऱ्या या मुलीचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा असल्याचं दिसून आलं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आयती चालून आलेली संधी टिंडर अ‍ॅपने इनकॅश केली. 

संपूर्ण नागपूरमध्ये होर्डींग्स

टिंडर अ‍ॅपने संपूर्ण नागपूर शहरामध्ये या बॅनरच्या फोटोचे मोठे होर्डींग लावले आहेत. या अ‍ॅपने केलेल्या अनोख्या जाहिरातीमध्ये एकाकडे या मुलीने पोस्टवर लिहिलेल्या मजकुराचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला, "शुभमन इकडे तर बघ" असं लिहिलं आहे. हे सर्व पाहून शुभमन गिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये शुभमनने या मुलीची इच्छा पूर्ण केल्याचं दिसत आहे. शुभमनने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शुभमनच्या पोस्टमध्ये काय?

भारताने मालिका जिंकल्यापासून पोस्टरवाली ही मुलगी चर्चेत आहे. यासंदर्भात गिलने त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नव्हती. मात्र आता त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने इशाऱ्यांमध्ये या पोस्टसंदर्भात विधान केलं आहे. "मी तर पाहिलं, आता तुम्ही नीट पाहा," असं म्हटलं आहे. इतकच नाही तर टिंडर अ‍ॅपचं इंटरफेस या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये गिलच्या फोटोखाली, 'तेरा हिरो इधर है,' अशी ओळ लिहिलेली आहे.

मित्रांनी घेतली फिरकी

नागपूरमध्ये पोस्टर लावण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वात आधी उमेश यादवने गिलची मस्करी केली. "संपूर्ण नागपूर पाहत आहे, शुभमन आता तरी पहा," अशी कमेंट उमेश यादवने केली आहे. तर शुभमनचा व्हिडीओ पाहून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग थक्क झाला असून त्याने, "नहीं यार" अशी कमेंट केली आहे. 

नागपूरच का?

नागपूरमध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चार सामन्यांपैकी पहिला सामना होणार आहे. त्यामुळे नागपूरमध्येच ही जाहिरातबाजी करण्यात आली आहे.