Rinku Singh Fathter Video Viral : भारतीय क्रिकेटचा उगवता तारा म्हणून आक्रमक फलंदाज रिंकू सिंगकडे (Rinku Singh) पाहिलं जातं. टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिंकू सिंगने आपल्या तडाकेबंद फलंदाजीने छाप उमटवली आहे. 2023 मध्ये रिंकू सिंगने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Internation Cricket) पदार्पण केलं. तेव्हापासून रिंकू सिंगने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रिंकू सिंगने एकाच षटकात सलग पाच षटकार ठोकले आणि त्यानंतर रिंकू सिंगसाठी टीम इंडियाचे (Team India) दरवाजे उघडले. आता भारताच्या टी20 आणि एकदिवसीय संघाचा तो हुकमी एक्का बनलाय.
रिंकूच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल
रिंकू सिंगने भारतासाठी आतापर्यंत 15 टी20 सामन्यात 89 च्या अॅव्हरेजने 356 धावा केल्या आहेत. आता रिंकू सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिंकूचे वडिल खानचंद सिंह (Khanchand Singh) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रिंकूचे वडिल गॅस सिलेंडची घरोघरी डिलिव्हरी करताना दिसत आहेत. एका लहान टेम्पोतून खांद्यावर सिलेंडर उचलून डिलिव्हरी देताना ते दिसतायत. रिंकू स्टार झाल्यानंतरही वडिल खानचंद सिंह यांनी काम सोडण्यास नकार दिला होता.
एका मुलाखतीत रिंकू सिंगने याबाबत खुलासा केला होता. टीम इंडियात जागा पक्की झाल्यानंतर वडिलांना आराम करण्यास सांगतिलं. आता तुम्हाला सिलेंडरचं ओझं वाहण्याची गरज नाही, असं रिंकूने वडिलांना सांगितला. पण आपण काम थांबवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आपल्या कामावर आपलं प्रेम असल्याचं ते सांगतात असं रिंकूने आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
Rinku Singh's father is seen supplying gas cylinders, Even as Rinku plays for India, his father continues his work as a gas cylinder provider.
Hardworking family pic.twitter.com/pjOrXOwG1K
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) January 26, 2024
रिंकूची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये रिंकू सिंगचा जन्म झाला. आयपीएलच्या गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रिंकू सिंगने दमदार कामगिरी केली. यावर्षीही केकेआरने 55 लाख रुपयात रिंकू सिंगला रिटेन केलं आहे. 2018 मध्ये केकेआरने रिंकू सिंगवर 80 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं होतं. पण पहिला हंगाम रिंकू सिंगसाठी अतिशय वाईट ठरला. पण यानंतर आयपीएलमध्ये रिंकू सिंगची बॅट तळपली. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने रिंकू सिंग बेस्ट फिनिशर असल्याचं कौतुक केलं होतं.
रिंकूच्या कामाचं कौतुक
रिंकू सिंगला आयुष्यात संघर्ष करावा लागला. वडिल गॅस सिलेंडर पोहोचवण्याचं काम करायचे. पण कुटुंब चालवण्यासाठी ते कमी पडायचे. वडिलांना हातभार लागावा यासाठी लहान असताना रिंकू सिंग एका कोचिंग सेंटरमध्ये लादी फुसण्याचं काम करायचा. आता स्टार झाल्यानंतरही रिंकू सिंग गरीबीतले दिवस विसरलेला नाही. अलिगढमधल्या महुआ खेडा स्टेडिअममध्ये रिंकू सिंग 100 खाटांचे वसतिगृह बांधत आहे. गरीबीमुळे मागे राहिलेल्या प्रतिभावान मुलांना या वसतीगृहात मोफत राहण्याबरोबर त्यांना क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचाही रिंकूचा उद्देश आहे.