Rohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान

Indian Cricket Team : टीम इंडियात सध्या सर्वात अनुभवी आणि वयस्क खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेटमधून तो कधी निवडत्ती होणार याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 12, 2024, 07:01 PM IST
Rohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान title=

Rohit Sharma On His Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या 37 वर्षांचा आहे. साहजिकच तो क्रिकेटमधून कधी निवृत्त (Retired) होणार याची चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्मा हा टीम इंडियातला सध्याचा सर्वात वयस्क खेळाडू आहे. पण निवृत्तीच्या चर्चांवर स्वत: हिटमॅन रोहित शर्मानेच खुलासा केला आहे. गौरव कपूरच्या शो 'ब्रेकपास्ट विथ चॅम्पियन' या कार्यक्रमात रोहित शर्माने आपली क्रिकेट कारकिर्द आणि इतर गोष्टींवर दिलखुलास मुलाखत दिली. याच मुलाखतीत रोहित शर्माने आपलाया रिटायरमेंट प्लानही (Retirement Plan) सांगितला आहे. 

रोहित शर्माचा रिटायरमेंट प्लान
या कार्यक्रमात रोहित शर्माला त्याच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित शर्माने सध्या मी चांगली कामगिरी करतोय, आणि पुढची आणखी काही वर्ष खेळत राहाण्याचा विचार करतोय, असं उत्तर दिलं. निवृत्तीआधी विश्व चषक जिंकण्याचं आपलं स्वप्न असल्याचंही रोहितने स्पष्ट केलं. 2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवली जाणार आहे, भारतीय क्रिकेट संघ यात विजयी ठरेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केलीय. पण टीम इंडियाला एकदाही आयसीसी विश्वचषक जिंकता आलेला नाही.

2023 मध्ये भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. पण अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. आणि पुन्हा एकदा भारताचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द
रोहित शर्माची भारतासाठी क्रिकेट कारकिर्द प्रचंड मोठी आहे. रोहित शर्मा भारतासाठी आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळलाय. तर तब्बल 262 एकदिवसीय आणि 151 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. याशिवाय आयपीएलमध्ये तो तब्बल 248 सामने खेळला आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 45.47 च्या अॅव्हरेजने 4138 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 12 शतकं आणि 17 अर्धशतकं जमा आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने 49.12 अॅव्हरेजने 10709 धावा केल्या आहेत. यात त्याने 31 शतकं आणि 55 अर्धशतकं ठोकलीत. यात तब्बल तीन वेळा दुहेरी शतकाचा समावेश आहे. 

रोहितने 151 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3974 धावा केल्या आहेत. यात 5 शतकं आणि 20 अर्धशतकं त्याने केलेत. तर आयपीएलमध्ये तो आतापर्यंत 248 सामने खेळला असून त्याने 6367 धावा केल्यात. तर एक शतकही झळकावलं आहे.