महिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल

cricket women premier league adani group owner ahmedabad team jay shah tweet wpl

Updated: Jan 25, 2023, 04:22 PM IST
महिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल title=

Women's Indian Premier League : पुरुष आयपीएल स्पर्धेनंतर आता महिला इंडियन प्रीमिअर लीगच्या (WIPL) पहिल्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाच संघांचा सहभाग असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाचही संघांचा लिलाव केला आहे. यामुळे बीसीसीची करोडो रुपयांची कमाई झाली आहे. पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला तब्बल 4669.99 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. वुमन्स प्रीमिअर लीग (WPL) असं या स्पर्धेचं नाव असेल. 

महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामात खेळणारे संघही निश्चित झाले आहेत. यात मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु, लखनऊ आणि दिल्ली संघांचा समावेश आहे. या पाचही संघांचा समावेश झाला आहे. महिला आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे अदानी ग्रुपने (Adani Group) आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. अदानी ग्रुपने अहमदाबाद संघावर बोली लावत मालकी हक्क मिळवले आहेत. 

कोणी कोणते संघ कितीला खरेदी केला?
1. अदानी स्पोर्ट्सलाइन PVT. LTD, अहमदाबाद, 1289 कोटी रुपये
2. इंडियाविन स्पोर्ट्स PVT. LTD, मुबंई, 912.99 कोटी रुपये
3. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स PVT. LTD, बंगळुरु, 901 कोटी रुपये
4. जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट  PVT. LTD, दिल्ली, 810 कोटी रुपये
5. कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स  PVT. LTD, लखनऊ, 757 कोटी रुपये

मार्चमध्ये महिला प्रीमिअर लीग?
बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगच्या वेळापत्रकाची घोषणा अद्याप केलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा याचवर्षी 4 ते 26 मार्च दरम्यान होऊ शकते. स्पर्धेपूर्वी महिला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडेल. पहिल्या हंगामात पाच संघांमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि नवी मुंबईतल्या डिवाय पाटील स्टेडिअमवर खेळवले जाऊ शकतात. मुंबईतलं वानखेजे स्टेडिअम पुरुष आयपीएल स्पर्धेसाठी राखीव असेल. 

महिला खेळाडूंच्या पर्समध्ये होणार वाढ
महिला आयपीएलमध्ये खेळाडूं लिलावासाठी प्रत्येक संघाच्या मालकी कंपनीकडे 12 करोड रुपयांची मर्यादा असेल. प्रत्येक वर्षी यात वाढ केली जाईल. दुसऱ्या हंगामात 12 कोटीवरुन 13.5 कोटी रुपये इतकी वाढ होईल. 2025 मध्ये 15 कोटी, 2026 मध्ये 16.5 कोटी, तर  2027 मध्ये 18 कोटी रुपयांपर्यंत वाढ होईल.

विजेत्या संघाला लागणार लॉटरी
महिला आयपीएलसाठी एकूण 10 कोटी रुपयांची बक्षीसं दिली जातील. विजेत्या संघाला तब्बल 6 कोटी रुपये आणि उपविजेता संघाला 3 कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.