close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#IndiaVsPakistan : 'कालपर्यंत हे बर्गर- पिझ्झा खात होते', पाकिस्तानी चाहत्याचा संताप

व्हायरल होतोय त्याचा व्हिडिओ 

Updated: Jun 17, 2019, 11:34 AM IST
#IndiaVsPakistan : 'कालपर्यंत हे बर्गर- पिझ्झा खात होते', पाकिस्तानी चाहत्याचा संताप

नवी दिल्ली : #IndiaVsPakistan  हा हॅशटॅग शनिवारपासूनच सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता. रविवारी तर या एका हॅशटॅगवर जोर देत अनेकांनीच भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्कंठा वाढवली होती.

एकिकडे मँचेस्टरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर या दोन्ही देशांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते, तर दुसरीकडे सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या क्रीडारसिकांमध्येही चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. भारताने World cup 2019 विश्वचषकातील या सामन्यात पाकिस्तानला नमवत विजयी रथ पुढे नेला. 

भारतीय संघाच्या या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, सामन्यातील फोटो व्हायरल झाले. पण, या साऱ्यामध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. मँचेस्टरमध्ये या दोन्ही संघाच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. त्यातच स्टेडियमबाहेर देशाप्रती आणि क्रिकेटच्या खेळाप्रती भावनांना उधाण आलं होतं. 

आपल्या देशाच्या संघाचा असा दारुण पराभव झाल्याचं पाहून पाकिस्तानच्या एका क्रीडारसिकाला त्याचं दु:ख, संताप आवरता आला नाही. 'काल रात्री हे लोक (पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडू) बर्गर खात होते.... पिझ्झा खात होते.... अरे यांना क्रिकेट खेळायचं सोडून दंगल लढण्यासाठी पाठवा', असं म्हणत त्याने भापल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याला अश्रूही अनावर झाले होते. संघाच्या वाट्य़ाला वारंवार येणारा पराभव आणि त्यानंतर उठणारी टीकेची झोड पाहता त्याचा संघावर मात्र काही परिणाम होत नसल्यामुळेच त्या चाहत्याची ही संतप्त भावना सर्वांसमोर व्यक्त झाली. 

मुळात क्रिकेट हा भावभावनांचा खेळ आहे, हे भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान वारंवार पाहायला मिळतं. दोन्ही देशांमध्ये असणारे एकंदर संबंध पाहता त्या बळावर देशातील जनतेच्या मनातही प्रत्येक बाबतीत शेजारी राष्ट्रावर वर्चस्व मिळवण्याची आर्त भावना पाहायला मिळते, याची अनेक उदाहरणं क्रिकेट सामन्याच्या वेळी पाहायला मिळतात.