राष्ट्रकुल स्पर्धा: बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णने जिंकलं सुवर्णपदक

Updated: Apr 14, 2018, 04:43 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण घोडदौड सुरुच आहे. शनिवारी भारताने उत्कृष्ट कामगिरीत करत तब्बल ८ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताच्या विकास कृष्णन याने  सुवर्णपदक मिळवलं आहे.

बॉक्सिंगमध्ये ७५ किलो वजनीगटात विकासने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवलं. भारताने बॉक्सिंगमध्ये तिसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. शनिवारी भारताने एकूण ८ सुवर्णपदक मिळवल्याने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडे आता २५ सुवर्णपदक झाले आहेत.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय.

महिला टेबल टेनिस एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्राने सुवर्णपदक मिळवलं आहे. मेरी कोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं. तिच्या पाठोपाठ पुरुषांच्या गौरव सोळंकीनं ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर, नेमबाजीत तेजस्विनी सावंत प्रमाणेच ५० मीटर थ्री पोझिशनमधील पुरुषांच्या स्पर्धेत संजीव राजपूतनं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमासह सुवर्ण पदक मिळवलं. 

मैदानी खेळांमध्ये नीरज चोप्रानं ८६.४७ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदकावर भारताची मोहर उमटवलीय. सुमित मलिकने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रमक केलाय. त्याने १२५ किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केलीय. दिवसातलं सहावं सुवर्णपदक विनेश फोगटनं पटकावलंय.

शनिवारच्या दिवसातील आठ सुवर्णपदकांमुळे भारताच्या खात्यात आतापर्यंत २५ सुवर्णपदकांची भर पडलीय.