नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दिल्लीचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा अयशस्वी ठरत आहे. शमीच्या या अपयशाचं कारण दिल्लीचा प्रशिक्षक जेम्स होप्स यानं सांगितलं आहे. वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांमुळे शमी अपयशी होत असल्याचं जेम्स होप्स म्हणालाय. २८ वर्षांचा मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. शमीची पत्नी हसीन जहांनं त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी शमीविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल झाली आहे. तसंच कोलकात्यामध्ये पोलिसांनी शमीची चौकशीही केली आहे.
एकीकडे पत्नीसोबत वाद सुरु असतानाच रस्ते अपघातामध्ये मोहम्मद शमी जखमी झाला होता. या अपघातामुळे आयपीएलआधी शमीला सरावही करता आला नाही. हसीन जहांनं शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोपही लगावले पण बीसीसीआयनं चौकशी करून शमीला क्लिन चीट दिली. यानंतरच शमीला आयपीएल खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.
शमीच्या आयुष्यात सध्या वाद सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणं त्याला कठीण होत आहे. त्याच्या आयुष्यातलं हे वादळ शमेल तेव्हाच तो क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करु शकेल. यासाठी शमीला थोडा वेळ द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया जेम्स होप्सनं दिली आहे.