मुंबई : आगामी वर्ल्ड कपमध्ये धोनीनं कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करावी याबद्दल अजूनही भारतीय टीम विचार करत आहे. पण धोनीचा आयपीएल टीम चेन्नईमधला सहकारी सुरेश रैनानं याबद्दल सल्ला दिला आहे. धोनी हा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी उपयुक्त आहे, असं रैना म्हणाला आहे. 'खेळामध्ये काय सुरू आहे ते धोनीला बरोबर कळतं. तसंच त्याच्या अनुभवाचाही फायदा होतो. एवढच नाही तर गरज असताना धोनी खेळी उभारू शकतो. तसंच सामना संपवण्याची त्याच्यासारखी शैली कोणाकडेच नाही', अशी प्रतिक्रिया रैनानं दिली.
३४० वनडेमध्ये धोनीनं ५१ च्या सरासरीनं १० हजारांपेक्षा जास्त रन केल्या आहेत. चौथ्या क्रमांकाबाबत अजूनही संभ्रम कायम असल्यामुळे धोनीची टीममधली मॅच संपवण्याची भूमिका आणखी महत्त्वाची होणार आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
चौथ्या क्रमांकाची समस्या कायम असल्यामुळे विराट कोहली या क्रमांकावर बॅटिंग करेल, असे संकेत भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले होते. यावर बोलताना रैना म्हणाला 'माझ्या मते कोहलीसाठी तिसरा किंवा चौथा क्रमांक चांगला आहे. सुरुवातीचे बॅट्समन झटपट बाद झाले, तर इनिंग सावरण्यासाठी कोहली उपयुक्त आहे.'
सध्या आयसीसी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारी इंग्लंड हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदाही इंग्लंडला मिळू शकतो, असं रैनाला वाटत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या टीमही वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्पर्धेत आहेत, असं भाकीत रैनानं केलं.
'इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्ट्या या स्विंग बॉलिंगला अनुकूल असायच्या, पण मागच्या काही वर्षांमध्ये स्पिनरनीही तिकडे चांगली कामगिरी केली आहे. मागच्या वर्षी मी भारतीय टीमसोबत इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये होतो, तेव्हा भारताच्या लेग स्पिनरनी चांगली कामगिरी केली होती. युवा आणि अनुभवी खेळाडूंचं भारतीय टीममध्ये चांगलं मिश्रण आहे. भारताचे फास्ट बॉलरही सगळ्या वातावरणात चांगली बॉलिंग करत आहेत. यामुळे भारतापुढे अडचणी कमी आहेत.' असं वक्तव्य रैनानं केलं.
२२६ वनडे मॅच खेळलेला रैना हा भारतीय टीमचा महत्त्वाचा भाग होता. पण जुलै २०१८ नंतर तो भारताकडून खेळला नाही. आक्रमक डावखुरा बॅट्समन आणि कामचलाऊ ऑफ स्पिनर असलेला रैना हा भारताचा सर्वोत्तम फिल्डरही आहे. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होण्याची आशा रैनाला आहे.
या महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होण्याची शेवटची संधी रैनाकडे असणार आहे. कठोर परिश्रम करत राहणं माझं काम आहे, चांगल्याची अपेक्षा करत आहे, असं रैना म्हणाला. २०११ साली भारतानं जिंकलेल्या वर्ल्ड कप टीममध्ये रैना होता.