मुंबई : भारताचा दिग्गज स्पिनर हरभजन सिंगने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नात्याबाबत मोठं विधान केलंय. यासोबतच हरभजन सिंगने बीसीसीआयवरही निशाणा साधलाय. आपल्या शेवटच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत बीसीसीआयकडून कोणताही पाठिंबा मिळाला नसल्याचा खुलासा हरभजन सिंहने केला आहे.
हरभजन सिंग शेवटचा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये 2016 मध्ये दिसला होता, जिथे त्याची कामगिरी फारशी खास नव्हती, ज्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले तेव्हा तो पुनरागमन करू शकला नाही.
हरभजन सिंगची एमएस धोनीसोबत भांडण असल्याचं हरभजन सिंगच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. मात्र यावर हरभजन सिंगने स्पष्ट केलंय की, आपल्यामध्ये आणि महेंद्रसिंग धोनीमध्ये कधीही मतभेद नव्हते.
स्वतःबद्दल आणि धोनीबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला, "माझ्या आणि धोनीमध्ये वाद कधीच नव्हते. माझी धोनीविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. इतक्या वर्षात आम्ही खूप चांगले मित्र आहोत."
हरभजन पुढे म्हणाला, "माझी त्यावेळच्या बीसीसीआयकडे तक्रार आहे. त्यावेळी बोर्डावर जे सिलेक्टर्स होते त्यांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने केलं नाही. त्यांनी संघाला कधीही एकजूट होऊ दिली नाही."