रणजी ट्रॉफी वाद : डीआरएस वापरण्याची कर्नाटकच्या प्रशिक्षकांची मागणी

रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या वादानंतर निर्णायक सामन्यांमध्ये डीआरएस वापरण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Updated: Jan 29, 2019, 10:01 PM IST
रणजी ट्रॉफी वाद : डीआरएस वापरण्याची कर्नाटकच्या प्रशिक्षकांची मागणी

बंगळुरू : रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या वादानंतर निर्णायक सामन्यांमध्ये डीआरएस वापरण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कर्नाटक आणि सौराष्ट्रमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये चेतेश्वर पुजाराला दोन वेळा आऊट असतानाही नॉट आऊट देण्यात आलं. दोन्ही वेळा बडोद्याचे अंपायर खलीद सैय्यद यांनी ही चूक केली. दुसऱ्या इनिंगमध्ये विनय कुमारच्या बॉलिंगवर पुजारा ३४ रनवर खेळत असताना त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागून विकेट कीपरच्या हातात गेला. यानंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी जल्लोषाला सुरुवात केली, पण अंपायरनी पुजाराला नॉट आऊट दिलं. तर पहिल्या इनिंगमध्ये पुजारा १ रनवर असताना त्याच अंपायरनं पुजाराला नॉट आऊट दिलं. यानंतर पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं आणखी ४४ रन काढल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं नाबाद १३१ रनची खेळी केली. पुजाराच्या या खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. तर कर्नाटकचं रणजी ट्रॉफीमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

अंपायरनी केलेल्या या मोठ्या चुकांनंतर नाराज झालेल्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर राव यांनी बीसीसीआयला एक पत्र लिहिलं आहे. बीसीसीआयनं सर्वोत्तम अंपायरची नियुक्ती करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

'६ महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर तुम्हाला अंपायरच्या चुकांमुळे रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळता येत नसेल तर ते खूप क्लेषदायक आहे. या मॅचनंतर खेळाडूंना अश्रू अनावर झाले. याबद्दल मी साबा करीम यांच्याशी बोललो आहे. अशा मॅचमध्ये सर्वोत्तम अंपायर (एलीट अंपायर) नियुक्त करावेत, अशी मागणी आम्ही केली आहे. पण अंपायर उपलब्ध नसल्याचा मुद्दा साबा करीम यांनी सांगितला आहे. पण ही कर्नाटकची चूक आहे का? याबद्दल मी बीसीसीआयला पत्र लिहिलं आहे. मॅच संपल्यानंतर मॅच रेफ्रींनी माझी माफी मागितली' असं राव म्हणाले.

मागच्या वर्षी मार्च महिन्यात स्थानिक कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या बैठकीचं बीसीसीआयनं आयोजन केलं होतं. या बैठकीतही अंपायरच्या खराब निर्णयाबद्दल चर्चा झाली होती. पण वर्षभरानंतरही यामध्ये काहीही बदल झालेला नाही. सेमीफायनलमधले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले, पण यातले प्रत्येक निर्णय हे कर्नाटकच्या विरोधातले नव्हते.

अंपायरचे खराब निर्णय हा मुद्दा असला तरी यावर्षी कमी अंपायर असताना बीसीसीआयनं रणजी ट्रॉफीमध्ये ९ नव्या टीमचा समावेश केला. अंपायरना लक्ष करणं सोपं असतं, असं याआधीही अनेक ज्येष्ठ अंपायरनी बोलून दाखवलं आहे. अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर अनेकवेळा प्रमाणापेक्षा जास्त टोकाची टीका होते. पण चांगला निर्णय देणाऱ्या अंपायरचं कौतुक होत नाही, असं अंपायरकडून सांगितलं जातं. कित्येक वेळा खेळाडूंकडूनही अंपायरवर मैदानातच टीका केली जाते.

२०१७-१८ सालच्या इराणी ट्रॉफीमध्ये गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलनं मैदानातच अंपायरवर टीका केली होती. चुकीचं आऊट दिल्यानंतर तुम्ही अंपायरिंग का करता?, असा सवाल पार्थिव पटेलनं अंपायरला विचारला होता. यावेळीही विनय कुमारनं अंपायरवर टीका केली. दिसत नसेल तर चष्मा घाला, असं विनय कुमार अंपायर सैय्यद यांना म्हणाला. 

या सगळ्या वादानंतर आता निदान रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्पर्धांमध्ये निर्णायक मॅचमध्ये डीआरएसचा वापर व्हावा, अशी मागणी होते आहे. कर्नाटकचे प्रशिक्षक येरे गौड यांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. आऊट असतानाही बॅट्समन खेळपट्टी सोडून जात नाहीत, कारण मागच्या वेळी आऊट नसतानाही त्यांना आऊट दिलं गेलं होतं. डीआरएस वापरल्यामुळे हा सगळा संभ्रम दूर होईल, असं येरे गौड म्हणाले.

एवढ्या सगळ्या वादानंतर बीसीसीआय डीआरएससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते का ते पाहावं लागणार आहे.