ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत गेल्या 42 दिवसांच्या नॉनस्टॉप अॅक्शननंतर 15 नोव्हेंबरला सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा (India vs New Zealand Semifinal) सामना रंगला. भारताने पहिली फलंदाजी करत वानखेडेच्या मैदानावर अक्षरश: दिवाळीचे फटाके फोडले. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुलने तुफान फटकेबाजी करत 397 धावांचा डोंगर उभा केला. यात विराट कोहलीने सेंच्युरीची हाफसेंच्युरी (Virat Kohli Century) केली. तर श्रेयस अय्यरनेही आक्रमक शतक (Shreyas Iyer Century) ठोकलं. या कामगिरीला आणखी चारचांद लागले ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि इंग्लंडचा स्टार फूटबॉलपटू डेव्हिडि बेकहॅमच्या (David Beckham) उपस्थितितीने.
बेकहॅम-विराट फुटबॉल खेळले
सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड बेकहॅम वानखेडे मैदानावर विश्वचषक ट्रॉफी घेऊन आले. यावेळी भारतीय क्रिके संघ मैदानावर फूटबॉलने सराव करत होता. बेकहॅम मैदानावरच येताच विराट कोहलीने त्याच्या दिशेने फुटबॉलला किक मारली. बेकहॅमनेही विराट कोहलीला साथ देत त्याच्या दिशेने फूटबॉल टाकला. दोघंही काहीवेळ फूटबॉल खेळले. यावेळी सचिन तेंडुलकर आणि बेकहॅमचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. याशिवाय सामन्यादरम्यान विराट कोहलीनेही बेकहॅमशी संवाद साधला.
बेकहॅमसाठी खास पार्टीचं आयोजन
दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती उद्योगपती आनंद आहूजाने एका खास डिनर पार्टीचं आयोजन केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही पार्टी स्टार फूटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसाठी आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीसाठी केवळ 25 जणांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
डेव्हिड बेकहॅम फुटबॉल जगतातल्या स्टार फुटबॉलपटूंपैकी एक आहे. इंग्लंड फुटबॉल संघाचं त्याने कर्णधारपदही भूषवलं आहे. बेकहॅम सध्या भारतात असून तो UNICEF चा गुडविल अॅम्बेसेडर आहे. या दरम्यान, सोनम कपूर आणि आनंद आहूजाने त्याला आपल्या निवासस्थानी डिनर पार्टीला आमंत्रित केलं आहे.
बेकहॅम ग्लोबल आयकॉन
डेव्हिड बेकहॅम ग्लोबल आयकॉन आहे. त्याची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅमही फॅशन आयकॉन आहे. डेव्हिड बॅकहेमची जगभरात प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. भारतातही त्याचे असंख्य चाहते आहेत. चाइल्ड राईट्स आणि जेंडर इक्वालिटी जाणून घेण्यासाठी तो याआधी गुजरातमध्ये आला होता. यासंदर्भातली पोस्ट त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.