FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप म्हटलं की काही खेळाडू आणि काही संघांची नावं हमखास समोर येतात. त्यातच जगविख्यात अशा या खेळाचा महाकुंभ सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले असल्यामुळं आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचा फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup 2022) कतारमध्ये पार पडत आहे. पहिल्यांदाच आखाती राष्ट्रांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यामुळं हीसुद्धा एक कुतूहलाचीच बाब म्हणावी लागेल. सध्याच्या घडीला बहुतांश राष्ट्रांचे खेळाडू कतारमध्ये (Qatar ) दाखल झाले आहेत. पण, यात चर्चा सुरुये ती म्हणजे अशा एका राष्ट्रातील खेळाडूंची ज्यांच्या विमानाच्या मागे सैन्याची लढाऊ विमानं (fighter jets) पाहायला मिळाली होती.
खेळाडू खेळण्यासाठी निघाले आहेत की त्यांच्यासोबत आणखी काही घडतंय? हेच सोशल मीडियावरील एक व्हिडीओ पाहून अनेकांनी विचारलं. हा संघ होता पोलंडचा (Poland Football team). फिफा वर्ल्डकपसाठी पोलंडचा संघ कतारच्या रोखानं निघाला आणि पाहता पाहता संघाच्या विमानाशेजारूनच लढाऊन विमानंही हवेत झेपावली. (fifa world cup 2022 why poland team flights ascort by fighter jets know the reason)
प्राथमिक स्तरावर पाहता या घटनेला (Russia Ukrain War) रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ देण्यात आला, यावेळी पोलंडवर रशियाकडून (Russia Poland attack) करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचाही संदर्भ सांगितला गेला. रशियाचे मनसुबे पाहता खेळाडूंच्या संरक्षणासाठी पोलंडच्या सरकारनं दोन लढाऊ विमानं पाठवली असं म्हटलं गेलं. पण, नेमकं कारण मात्र वेगळंच होतं.
पोलंडचे संरक्षण मंत्री (Defence Minister) Mariusz Blaszczak यांनी शुक्रवारी देशातील रेडिओवर संघाच्या विमानासोबत गेलेल्या लढाऊ विमानांसंदर्भातील चर्चांबाबत स्पष्टीकरण दिलं. संघाला एका प्रकारे पाठिंबा देणं ही चांगलीच बाब असल्याचं ते म्हणाले. Blaszczak यांनी ट्विट करत आपल्या देशाचा संघ कतारसाठी निघाल्याचं म्हणत त्यांना F-16 ही लढाऊ विमानं देशाच्या सीमेपर्यंत साथ देती असं म्हणत खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
Nasi piłkarze już w drodze na Mistrzostwa Świata w Katarze. Do granicy eskortują ich polskie F-16. Powodzenia! pic.twitter.com/8DLZbDMU06
— Mariusz Błaszczak (@mblaszczak) November 17, 2022
Blaszczak यांनी सांगितल्यानुसार ही लढाऊ विमानं पाठवणं हा वैमानिकांच्या दैनंदिन सरावाचाच एक भाग होता असं कारण देत त्यांनी कुठेच युद्ध, धोका अशा शब्दांचा वापर केला नाही. एकिकडून पोलंडच्या संरक्षण मंत्र्यांकडूनच ही माहिती देण्यात आल्यामुळं आता रशियाच्या हल्ल्यांशी याचा संबंध नाही असंच कळत आहे. पण खेळाडूंची सुरक्षितता हा छुपा हेतूही त्यामागे असू शकतो ही बाब नाकारता येत नाही.