Portugal vs Morocco: क्रिस्टियानो रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; मोरक्कोकडून पराभव

पोर्तुगालचा स्टार प्लेयर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. फीफा वर्ल्ड कप 2022 मधून पोर्तुगालची टीम बाहेर पडली आहे. 

Updated: Dec 10, 2022, 11:16 PM IST
Portugal vs Morocco: क्रिस्टियानो रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; मोरक्कोकडून पराभव title=

Portugal vs Morocco: पोर्तुगालचा स्टार प्लेयर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. फीफा वर्ल्ड कप 2022 मधून पोर्तुगालची टीम बाहेर पडली आहे. आज क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मोरक्को विरूद्ध पोर्तुगाल (Portugal vs Morocco) असा सामना रंगला होता. या सामन्यात पोर्तुगालचा 0-1 ने पराभव झाला आहे. पराभवानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो भावूक (Cristiano Ronaldo Emotional) झाल्याचं दिसून आलं आहे. या पराभवासोबत पोर्तुगालचा वर्ल्डकपचा (FIFA World Cup 2022) प्रवास इथेच संपला आहे. 

या विजयासह मोरोक्कोने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना चौथ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या टीमशी होणार आहे. या सामन्यात सुरुवातीपासूनच पोर्तुगाल आणि मोरोक्को यांच्यात चुरशीची स्पर्धा रंगली होती. सामन्यातील पहिला गोल 42 व्या मिनिटाला युसूफ एन नेसरीने केला. या एकमेव गोलच्या जोरावर मोरोक्कोने हा संपूर्ण सामना जिंकला. पोर्तुगालकडून एकाही खेळाडूला गोल करणं शक्य झालं नाही. 

मोरोक्कोने रचला इतिहास 

या विजयासह मोरोक्कोने इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवलंय. फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात सेमीफायनल गाठणारी ही पहिली आफ्रिकन टीम ठरलीये. यापूर्वी कॅमेरूनने 1990 मध्ये, सेनेगलने 2002 मध्ये तर घानाने 2010 मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया केली होती. दुसरीरकडे पोर्तुगालाची टीम केवळ दोनवेळा (1966, 2006) टॉप-4 मध्ये पोहोचलीये. 

रोनाल्डोला अश्रू अनावर 

मोरक्कोने केलेल्या पराभवानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर झाले होते. सामना संपल्यानंतर तो शांतपणे डग आऊटमध्ये निघून गेला. मात्र त्यानंतरचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोनाल्डोला अश्रू अनावर झाल्याचं दिसून येतंय. 

रोनाल्डोशिवाय पोर्तुगाल उतरली मैदानात

या सामन्यात पोर्तुगालची टीम स्टार खेळाडू रोनाल्डोशिवाय मैदानात उतरली होती. सलग दुसऱ्या सामन्यात रोनाल्डोला फर्स्ट हाफ म्हणजेच सुरुवातीच्या-11 मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. रोनाल्डोला 52 व्या मिनिटाला मैदानात सबस्टिट्यूट म्हणून बोलावण्यात आलं. रुबेन नेव्हसच्या जागी तो सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरला. मात्र तरीही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही.

या सामन्यात रोनाल्डोने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने सर्वाधिक 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केलीये. या विक्रमाच्या बाबतीत रोनाल्डो कुवेतच्या बादर अल मुतावाच्या सोबत आला आहे.