'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान

T20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 3, 2024, 03:01 PM IST
'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान title=

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट आणि यशस्वी जैसवाल यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोणाला खेळवावं यासंदर्भात चर्चा सुरु असताना ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) स्पष्ट मत मांडलं आहे. मॅथ्यू हेडनने आघाडीच्या फलंदाजांसाठी उजवं-डावं कॉम्बिनेशन निवडताना विराट कोहली आणि यशस्वी जैसवालची निवड केली आहे. यावेळी त्याने विराट कोहली माझ्या प्लेईंग 11 संघात पहिल्या क्रमांकावर खेळेल किंवा त्याला संघातच घेणार नाही असंही स्पष्ट सांगितलं आहे. 

विराट कोहलीने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीमुळे तो रोहित शर्मासह पहिल्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विराट कोहलीने 15 डावांमध्ये 741 धावा केल्या असून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. 

भारतीय संघ आयर्लंडविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे. 5 जूनला हा सामना होणार आहे. मॅथ्यू हेडनने ESPNCricinfo शी संवाद साधताना आपल्या प्लेईंग 11 संघाची घोषणा केली. यावेळी त्याने पहिल्या क्रमांकासाठी उजवं-डावं फलंदाजी कॉम्बिनेशन निवडताना विराट कोहली एकतर पहिल्या क्रमांकावर खेळेल किंवा मग संघात नसेल असं सांगितलं आहे. 

"तुमच्याकडे उजवं-डावं कॉम्बिनेशन असायला हवं. तुमच्याकडे सलग 5 उजव्या हाताचे फलंदाज असू शकत नाहीत. माझ्या संघात विराट कोहली एकतर पहिल्या क्रमांकावर खेळेल किंवा मग खेळणार नाही. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे," असं मॅथ्यू हेडन म्हणाला आहे. हेडनने संघात रोहित शर्माला चौथ्या क्रमांकावर ठेवलं असून यामागील कारण विचारलं असत म्हणाला क, रोहित शर्मा अष्टपैलू कर्णधार असून मधल्या फळीत तो चांगली कामगिरी करु शकतो. 

"रोहित शर्मा अष्टपैलू कर्णधार असून मधल्या फळीत खेळताना त्याला लाज वाटणार नाही. टी-20 मध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. तो मधल्या फळीतून फलंदाजीचं नेतृत्व करु शकतो," असं मॅथ्यू हेडनने सांगितलं.

रोहितने भारताकडून 151 सामने खेळताना 3974 धावा केल्या आहेत. त्यापैकी 27 सामन्यांमध्ये त्याने त्याच्या नेहमीच्या ओपनिंग पोझिशनवर न खेळता पाच अर्धशतकांसह 481 धावा केल्या. त्यापैकी आठ अर्धशतकं चौथ्या क्रमांकावर खेळताना केली आहेत. 2022 त्याने अखेरचं अर्धशतक केलं. तसंच दोन अर्धशतकांसह 122.87 च्या स्ट्राइक रेटने 188 धावा केल्या. आयपीएलमध्ये, त्याने 91 डावांमध्ये पहिल्या क्रमांकावर फलंदाजी केली.