विराट, सचिन नव्हे तर हा आहे सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर; अंबानीही पाहत राहतील इतकं मोठं घर

भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या श्रेणीअंतर्गत करारबद्द आहे. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली नव्हे तर समरजीत सिंग रणजीत सिंह गायकवाड सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...  

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2023, 05:47 PM IST
विराट, सचिन नव्हे तर हा आहे सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर; अंबानीही पाहत राहतील इतकं मोठं घर title=

विराट कोहली हा सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू आहे. एका रिपोर्टमध्ये विराट कोहीलीची एकूण संपत्ती 1000 कोटी असल्याचा दावा करण्यात आला होता. जागतिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीतही विराट कोहलीला स्थान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असा क्रिकेटर आहे ज्याने संपत्तीच्या बाबतीत फक्त विराट कोहली नव्हे तर महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर या क्रिकेटरचं घर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापेक्षाही मोठं आहे. भारताच्या या माजी क्रिकेटरचं नाव समरजीत सिंह रणजीत सिंह गायकवाड असं आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटर

समरजीत सिंग रणजीत सिंह गायकवाड एका राजेशाही कुटुंबाचे सदस्य आहे. 25 एप्रिल 1967 रोजी समरजीत सिंह गायकवाड यांचा जन्म झाला. गुजरात्या बडोदा येथील ते राजा आहेत. समरजीत सिंह गायकवाड प्रथम श्रेणीचे क्रिकेटर होते. रणजी ट्रॉफीत त्यांनी बडोदाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आघाडीचे फलंदाज म्हणून खेळणाऱ्या समरजीत सिंह गायकवाड यांनी सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. 

लक्ष्मी विलास राजवाड्याचे मालक

समरजीत सिंह गायकवाड हे रणजीत सिंह प्रताप सिंह गायकवाड आणि शुभांगिनी यांचे एकुलते एक पुत्र आहेत. 2012 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी गादी सांभाळली. समरजीत सिंह गायकवाड हे जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेसचे मालकदेखील आहेत. हा पॅलेस बकिंहम पॅलेसपेक्षा 4 पट मोठा आहे. समरजीत सिंह गायकवाड यांचं लग्न राधिका राजे यांच्याशी झालं आहे. राधिका राजे यांना वांकानेर राजघराण्यातील आहेत. 

1890 मध्ये उभारण्यात आला राजमहाल

हाऊसिंग डॉट.कॉमनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस 3,04,92,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलं आहे. याउलट मुकेश अंबानींचा बंगला 48,780 चौरस फूट क्षेत्रफळात आहे. लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. दरम्यान, बकिंघम पॅलेस 828,821 चौरस फूट क्षेत्रफळात आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी 1890 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस उभारला. या आलिशान महलात एक गोल्फ कोर्सही आहे. 
 
समरजीत सिंह गायकवाड यांची संपत्ती इतर क्रिकेटर्सच्या तुलनेत फार आहे. त्यांच्या संपत्ती 20 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. समरजीत सिंह गायकवाड हे गुजरात आणि बनारसमधील 17 मंदिरांच्या ट्रस्टवरही आहेत. 

विराट कोहलीची संपत्ती

विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या श्रेणीअंतर्गत करारबद्द आहे. त्याला बोर्डाकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख मानधन मिळतं. कोहली आयपीएल संघ बंगळुरुकडून वर्षाला 15 कोटींची कमाई करतो. 

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरती एकूण संपत्ती 1250 कोटींच्या आसपास आहे. तर माजी कर्णधार धोनीची एकूण संपत्ती 1040 कोटी असल्याचा अंदाज आहे.