माजी क्रिकेटपटू माधव आपटेंचं निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते.

Updated: Sep 23, 2019, 11:40 AM IST
माजी क्रिकेटपटू माधव आपटेंचं निधन
फोटो सौजन्य : विनोद कांबळी ट्विटर

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात माधव आपटेंनी अखेरचा श्वास घेतला. माधव आपटे यांच्या निधनानंतर क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'माधव आपटेंच्या निधनामुळे मला दु:ख झालं आहे. खरे क्रिकेटप्रेमी, उत्तम बॅट्समन आणि तेवढाच चांगला माणूस, कशाचीही अपेक्षा न करता क्रिकेटवर प्रेम करणारे. उत्तम पाहुणचार करणारे आणि चांगल्या गोष्टी सांगणारे.' असं ट्विट हर्षा भोगले यांनी केलं आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनेही माधव आपटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 'माधव आपटे सरांचं निधन झालं, मला बोलायला शब्दही सुचत नाहीयेत. लहान असताना मी त्यांचाच सल्ला घ्यायचो. त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिलं. मला आणि माझ्या वडिलांना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचं भाग्य मिळालं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,' असं विनोद कांबळी म्हणाला.

माधव आपटे हे ५ ऑक्टोबरला ८७ वर्षांचे होणार आहे. १९५२ ते १९५३ साली माधव आपटेंनी भारताकडून ७ टेस्ट मॅच खेळल्या. ओपनर असलेल्या आपटेंनी १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ५४२ रन केल्या. माधव आपटेंनी ६७ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ६ शतकं आणि १६ अर्धशतकांसह ३,३३६ रन केले होते. १९८९ साली माधव आपटेंची क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर ते सीसीआयच्या लिजंड्स क्लबचे अध्यक्षही होते.