शेतकरी आंदोलनाचा 200 वा दिवस, विनेश फोगट पोहोचली शंभू बॉर्डरवर, राजकारणात येण्याबाबत केला खुलासा

भारताची ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट ही सुद्धा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शंभू बॉर्डरवर पोहोचली.

Updated: Aug 31, 2024, 03:43 PM IST
शेतकरी आंदोलनाचा 200 वा दिवस, विनेश फोगट पोहोचली शंभू बॉर्डरवर, राजकारणात येण्याबाबत केला खुलासा  title=
(Photo Credit : Social Media)

Vinesh Phogat Farmer Protest : शंभू बॉर्डर मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 200 वा दिवस असून यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून जोरदार निदर्शन करण्यात आले. यावेळी भारताची ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट ही सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शंभू बॉर्डरवर पोहोचली. यावेळी तेथील शेतकरी नेत्यांनी विनेशचे स्वागत करून तिचा सत्कार देखील केला. यावेळी विनेशने शेतकरी आंदोलनाबाबत तिची भूमिका मांडली तसेच राजकारणात एंट्रीबाबत सुद्धा महत्वाचे भाष्य केले. 

शेतकऱ्यांची ऊर्जा अजूनही कमी झाली नाही : 

विनेश फोगटने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करताना म्हंटले की, "शेतकरी त्यांच्या हक्कासाठी मागील अनेक काळापासून येथे बसलेत, परंतु त्यांची ऊर्जा अजूनही कमी झालेली नाही. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी एका शेतकरी कुटुंबात जन्मले आहे. तुमची मुलगी तुमच्या सोबत आहे. आपल्या हक्कांसाठी आपल्याला स्वतः उभे रहावे लागेल कारण आपल्यासाठी कोणी येणार नाही. मी देवाकडे प्रार्थना करते की तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होउ दे, आणि जो पर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मागे हटू नका". विनेश पुढे म्हणाली, " जेव्हा आम्ही आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवतो तेव्हा प्रत्येकवेळी ते राजकारण नसते, तुम्हाला आमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं." 

हेही वाचा : धोनी सोबत खेळलेला हा क्रिकेटर पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरचं काम

विनेश फोगटने शेतकऱ्यांसाठी सरकारकडे केली मागणी : 

विनेश फोगटने शेतकऱ्यांचं समर्थन करत सरकारकडे मागणी केली की, "शेतकरी आपल्या अधिकारांसाठी 200 दिवसांपासून आंदोलन करत आहेत तेव्हा मी सरकारकडे अपील करते की त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. हे खूप दुःखद आहे की 200 दिवसांपासून त्यांचे ऐकले गेले नाही. आम्हाला त्यांच्याकडे पाहून स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळते".

 

2 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी : 

शंभू बॉर्डरवर शेतकरी मागील पाच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. 22 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. यात सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांसोबत बैठक सुरु ठेवण्यास सांगितले होते. पंजाब हरियाणा सरकारने शेतकऱ्यांबाबत झालेल्या बैठकीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला होता. ही बैठक सुनावणीच्या एक दिवस आधी पटियाला येथे झाली होती. यात कोर्टाने अंगितले होते की त्यांनी पंजाबच्या कमेटी सदस्य म्हणून तीन नावांचा प्रस्ताव मांडावा. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होईल. 

विनेश फोगटला  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालं अपयश : 

विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून मेडल न घेता रिकाम्या हातीच भारतात परतावं लागलं. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक तरी देण्यात यावे यासाठी क्रीडा लवादाकडे याचिका करण्यात आलेली होती. मात्र ही याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.