लॉकडाऊननंतर क्रिकेट बदलणार! हे नवे नियम लागू होणार

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

Updated: May 23, 2020, 05:36 PM IST
लॉकडाऊननंतर क्रिकेट बदलणार! हे नवे नियम लागू होणार title=

दुबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. पण आता लॉकडाऊननंतरचं क्रिकेट पूर्णपणे वेगळं असेल. कारण आयसीसीने त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. खेळाडूंना मैदानातल्या त्यांच्या सवयी यामुळे बदलाव्या लागणार आहेत. खेळाडूंना सरावादरम्यान शौचालयाला जायला आणि अंपायरना टोपी किंवा गॉगल द्यायला परवानगी मिळणार नाही.

आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडू त्यांची टोपी, टॉवेल, गॉगल, स्वेटर अंपायरकडे देऊ शकणार नाही, तसंच खेळाडूंनी एकमेकांपासून शारिरिक अंतर ठेवावं. पण खेळाडूंचं सामान कोणाकडे ठेवायचं? हे आयसीसीने सांगितलं नाही. एवढच नाही तर अंपायरनी बॉल पकडताना हातमोजे वापरावेत, अशा सूचनाही आयसीसने केल्या आहेत.

खेळाडू त्यांची टोपी आणि गॉगल मैदानात ठेवू शकणार नाहीत. टोपी आणि गॉगल मैदानात ठेवल्यास पेनल्टी रन दिल्या जातील, जशा मैदानातल्या हेल्मेटला बॉल लागल्यानंतर दिल्या जातात. खेळाडूंनी मॅचच्या आधी आणि नंतर कमीत कमी वेळ ड्रेसिंग रूममध्ये घाललावा, असंही आयसीसीने सांगितलं आहे.

आयसीसीच्या क्रिकेट समितीने याआधीच खेळाडूंनी बॉलवर थुंकी किंवा लाळ लावू नये, अशी शिफारस केली आहे. तसंच खेळाडूंनी बॉलला हात लावल्यानंतर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. सरावादरम्यानही खेळाडूंसमोर अडचण येऊ शकते, कारण त्यांना शौचालयाचा वापर करायलाही बंदी घालण्यात आली आहे.