आफ्रिदीला कोरोना, गंभीरनं दिली ही प्रतिक्रिया

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Jun 13, 2020, 09:37 PM IST
आफ्रिदीला कोरोना, गंभीरनं दिली ही प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली :  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. शाहिद आफ्रिदीला झालेल्या कोरोनावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. क्रिकेटच्या मैदानातही या दोन्ही खेळाडूंमधले वाद जगाने पाहिले. 

'माझे शाहिद आफ्रिदीबरोबर राजकीय मतभेद आहेत, पण जगात कोणालाच कोरोना होऊ नये. शाहिद आफ्रिदी कोरोनातून लवकरात लवकर बरा व्हावा. पण आफ्रिदीपेक्षा मला आपल्या देशाची काळजी आहे. भारतातली कोरोना झालेली प्रत्येक व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी,' असं गंभीर म्हणाला आहे. 

'मला माझ्या देशातल्या लोकांची काळजी करणं गरजेचं आहे. पाकिस्तानने भारताला मदत देऊ केली होती, पण त्यांनी पहिले त्यांच्याच देशातल्या लोकांना मदत केली पाहिजे. पाकिस्तानने देऊ केलेल्या मदतीबाबत धन्यवाद, पण त्यांनी पहिले दहशतवादी कारवाया बंद केल्या पाहिजेत,' असं वक्तव्य आफ्रिदीने केलं. 

'गुरुवारपासून मला अस्वस्थ वाटत आहे. शरीरही खूप दुखत आहे. माझ्या कोरोना टेस्टचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. मी लवकर बरा होईन, यासाठी प्रार्थना करा', असं आवाहन करणारं ट्विट आफ्रिदीने केलं. 

कोरोना व्हायरसच्या साथीत लॉकडाऊनदरम्यान शाहिद आफ्रिदी पाकिस्तानमधल्या गरीब आणि गरजूंना मदत करताना दिसला. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात आफ्रिदी त्याच्या एनजीओच्या माध्यमातून अन्नधान्य आणि इतर गरजेच्या वस्तू पोहोचवत होता. 

शाहिद आफ्रिदीची ही मदत बघून युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे क्रिकेटपटूही प्रभावित झाले. युवराज आणि हरभजननेही शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं. हरभजन आणि युवराजच्या या आवाहनावर भारतीय चाहत्यांनी टीकाही केली. पण त्यानंतरही या दोघांनी मदतीचं समर्थन केलं. 

कोरोना व्हायरसदरम्यान मदत करत असतानाच शाहिद आफ्रिदीने काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर युवराज आणि हरभजन यांनी आपण आफ्रिदीला मदत करण्याचं आवाहन करून चूक केल्याचं कबूल केलं. तसंच आफ्रिदीसोबतचे संबंधही तोडून टाकले. 

'मोदींचं मन आणि डोकं कोरोनापेक्षा मोठा आजार आहे. कोरोना व्हायरसवरून मोदी राजकारण करत आहेत आणि आमच्या काश्मीरी भाऊ-बहिण आणि वृद्धांवर अत्याचार करत आहेत. मोदींना याचं उत्तर द्यावं लागेल,' असं आफ्रिदी म्हणाला होता.