शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण, म्हणाला...

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Jun 13, 2020, 04:05 PM IST
शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण, म्हणाला...

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदीनेच ट्विट करून ही माहिती दिली आहे. मी लवकर बरा होईन, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहनही आफ्रिदीने त्याच्या चाहत्यांना केलं आहे. 'गुरुवारपासून मला अस्वस्थ वाटत आहे. शरीरही खूप दुखत आहे. माझ्या कोरोना टेस्टचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत,' असं ट्विट आफ्रिदीने केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

कोरोना व्हायरसच्या साथीत लॉकडाऊनदरम्यान शाहिद आफ्रिदी पाकिस्तानमधल्या गरीब आणि गरजूंना मदत करताना दिसला. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात आफ्रिदी त्याच्या एनजीओच्या माध्यमातून अन्नधान्य आणि इतर गरजेच्या वस्तू पोहोचवत होता. 

शाहिद आफ्रिदीची ही मदत बघून युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे क्रिकेटपटूही प्रभावित झाले. युवराज आणि हरभजननेही शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं. हरभजन आणि युवराजच्या या आवाहनावर भारतीय चाहत्यांनी टीकाही केली. पण त्यानंतरही या दोघांनी मदतीचं समर्थन केलं. 

कोरोना व्हायरसदरम्यान मदत करत असतानाच शाहिद आफ्रिदीने काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर युवराज आणि हरभजन यांनी आपण आफ्रिदीला मदत करण्याचं आवाहन करून चूक केल्याचं कबूल केलं. तसंच आफ्रिदीसोबतचे संबंधही तोडून टाकले. 

'मोदींचं मन आणि डोकं कोरोनापेक्षा मोठा आजार आहे. कोरोना व्हायरसवरून मोदी राजकारण करत आहेत आणि आमच्या काश्मीरी भाऊ-बहिण आणि वृद्धांवर अत्याचार करत आहेत. मोदींना याचं उत्तर द्यावं लागेल,' असं आफ्रिदी म्हणाला होता. 

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानकडून ३९८ वनडे, ९९ टी-२० आणि २७ टेस्ट मॅच खेळल्या. आफ्रिदीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ४७६ सिक्स मारल्या. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिस गेल (५३४ सिक्स)नंतर सर्वाधिक सिक्स शाहिद आफ्रिदीच्याच नावावर आहेत. 

About the Author