इंग्लंडविरुद्ध या खेळाडूंना संधी द्यावी, अजहरचा कोहलीला सल्ला

इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि वनडे सीरिज संपल्यानंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Updated: Jul 22, 2018, 09:52 PM IST
इंग्लंडविरुद्ध या खेळाडूंना संधी द्यावी, अजहरचा कोहलीला सल्ला title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि वनडे सीरिज संपल्यानंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टला पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीननं विराट कोहलीला सल्ला दिला आहे. टेस्ट सीरिजमध्ये भारतानं आर.अश्विन आणि कुलदीप यादवला घेऊन मैदानात उतरावं, असं अजहर म्हणाला आहे. अजहर १९८६ साली इंग्लंडला त्यांच्याच जमिनीवर हरवणाऱ्या भारतीय टीमचा सदस्य होता. इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवण्याची भारताकडे सर्वोत्तम संधी आहे कारण भारतीय टीम सगळ्याच क्षेत्रात मजबूत आहे, असं अजहर म्हणाला.

भारताला हरवणं कठीण

इंग्लंडला भारताला हरवणं कठीण आहे कारण त्यांची फास्ट बॉलिंग म्हणावी तशी चांगली नाही. पण भारताची फास्ट बॉलिंग आक्रमक आहे. इंग्लंडकडे जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासारखे तगडे बॉलर आहेत. पण त्यांना दुखापतीनं ग्रासलं आहे तसंच ते त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत, अशी प्रतिक्रिया अजहरनं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

टीममध्ये दोन स्पिनर आवश्यक

भारतानं टेस्ट मॅचमध्ये तीन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनरना घेऊन मैदानात उतरावं. पण जर खेळपट्टीवर गवत असेल तर विराट चार फास्ट बॉलर आणि एका स्पिनरचा विचार करू शकतो. पण मॅच जिंकायची असेल तर तीन फास्ट बॉलर आणि २ स्पिनर टीममध्ये असले पाहिजेत. इंग्लंडमध्ये सध्या उन्हाळा आहे आणि त्यामुळे तिथल्या खेळपट्ट्या सुकलेल्या आहेत. अशावेळी स्पिनर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं अजहरला वाटतंय.

भारताकडे चांगले स्विंग बॉलर

खेळपट्टीवर गवत ठेवलं तरंच इंग्लंडची बाजू भक्कम होईल. पण भारताकडेही तोडीसतोड स्विंग बॉलर असल्याचं अजहर म्हणाला. सध्याचा फॉर्म बघता स्पिनर म्हणून कुलदीपला संधी देण्यात यावी, असं वक्तव्य अजहरनं केलं आहे. पण कोहलीनं चार फास्ट बॉलर आणि एक स्पिनर घेऊन खेळायचं ठरवलं तर अनुभव बघता अश्विनलाच संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया अजहरनं दिली.

यो-यो टेस्ट आधी घ्या

भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी आवश्यक असलेली यो-यो टेस्ट निवड व्हायच्या आधी घ्यावी, असं अजहर म्हणाला. तसंच सध्याची भारतीय टीम आत्तापर्यंतची सगळ्यात फिट टीम आहे, असं वक्तव्य अजहरनं केलं.