कोईम्बतूर : एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे खेळाडू सुवर्णकामगिरी करतायत तर दुसरीकडे भारतात असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी मेडल जिंकूनही गरिबीत दिवस काढावे लागतायत. तामिळनाडूमधील अशीच एक राज्यस्तरीय क्रीडापटू आहे जिने राज्यस्तरावर अनेक पदके जिंकलीत मात्र तिला आता जीवन जगण्यासाठी चहा विकावा लागतोय. ही कहाणी आहे ४५ वर्षीय राज्यस्तरीय अॅथलीट कलाईमणीची.
कलाईमणीने राज्यस्तरावर कामगिरी करताना चार गोल्ड मेडल मिळवली. कलाईमणी फोनेक्स रनर्स टीमसाठी ४१ किमी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतेय. यासाठी ती मेहनतही करतेय. आपले कुटुंब आणि तीन मुलांच्या पोषणासाठी ही अॅथलीट कोईम्बतूरमध्ये चहा विकतेय. चहाच्या दुकानावर तिच्या कुटुंबाचे पालन पोषण केले जातेय.
कलाईमणी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, मला सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाहीये. मी दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमावते आणि हे चहाचे दुकान चालवत मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करते.
भलेही कलाईमणी आपल्या खेळाच्या आवडीला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. मात्र सकाळी उठून ती वर्कआउट सेशन नेहमी करते. यासोबतच ती दिवसाला २१ किमी धावते.
कलाईमणीच्या मते राष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये भाग घेण्यासाठी मी बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच बँकेने मला कर्ज दिले नाही. यासाठी स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी मला मित्रांकडून मदत घ्यावी लागली.