IPL 2023 : हार्दिक पांड्यानं फार कमी वेळातच क्रिकेट जगतामध्ये आपली छाप सोडली. अवघ्या काही वर्षांतच खेळाच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या बळावर चर्चेत आलेल्या या खेळाडूकडे सध्या आयपीएलच्या नव्या हंगामात गुजरातच्या संघाची जबाबदारी आहे. या संघाचं कर्णधारपद भूषवत असताना हार्दिक त्याच्या संघातील खेळाडूंसमवेत मैदानाबाहेर असताना एखाद्या खास मित्राप्रमाणंच वागताना दिसत आहे. (Gujarat Titans captain Hardik Pandya Joins Rashid Khan And Afghan Teammates For Ramadan Sehri see photo )
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये हार्दिकचा आणखी एक फोटो समोर आला आहे. या फोटोच्या निमित्तानं हार्दिकच्या एका कृतीची प्रचंड चर्चाही सुरु आहे. या कृतीमुळं त्यानं फक्त भारतीयच नव्हे, तर अफगाणी क्रिकेटप्रेमींची आणि नागरिकांचीही मनं जिंकणी असणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
गुजरातच्या संघातील अफगाणिस्ताचा खेळाडू राशिद खान यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळं हार्दिकनं सर्वांच्या नजरा वळवल्या. जिथं तो संघातील खेळाडू राशिद खान आणि नूर लखनवीसोबत दिसत आहे. जमिनीवरच बसलेल्या या मंडळींच्या मधोमध काही खाद्यपदार्थ पाहायला मिळत आहेते. राशिदनं या फोटोसाठी लिहिलेलं कॅप्शन पाहता लगेचच या फोटोमागची कहाणी कळत आहे.
सध्या मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असणारा रमजान महिना सुरु असून, त्यातील रोजेही सुरु आहेत. यातच सेहरी आणि इफ्तारीला अतिशय महत्त्वं. अशा सेहरीसाठी हार्दिकनं संघातील खेळाडूंना साथ दिली. त्याचा हा अंदाज खेळाडूंचीही मनं जिंकून गेला. इतकंच नव्हे, तर क्रिकेटप्रेमींच्याही मनाचा ठाव घेतला.
असं म्हणतात की, खेळामध्ये धर्म- पंथ किंवा इतर कोणत्याच भींती नसतात. त्यामुळं याच खेळाच्या बळावर जोडलेलं नातं जपण्यासाठी हार्दिक संघातील सोबतच्या खेळाडूंना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या क्षणी त्यांच्यासोबत दिसला. सोशल मीडियावर हा दिवसभरातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि लाईक्स, शेअर्स मिळवणारा फोटो ठरला आहे.
राशिदनं हा सुरेख फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. 'काय कमाल कर्णधार आहे. संघातील खेळाडूंसाठी लवकर उठून सेहरीसाठी हजर राहिला... कमाल.!', 'हेच भारताचं खरं सौंदर्य आहे...' अशा एक ना अनेक कमेंट्स या फोटोखाली आल्याचं पाहायला मिळालं.