Hockey India League मध्ये आतापर्यंत सर्वात महागडा विकला गेला 'हा' भारतीय कर्णधार

Hockey India League Auction 2024: हॉकी इंडिया लीग 2024 च्या लिलावात या कर्णधारावर सर्वात मोठी बोली लावण्यात आली आणि त्याला ७८ लाख रुपयांना विकत घेण्यात आले. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 14, 2024, 07:09 PM IST
Hockey India League मध्ये आतापर्यंत सर्वात महागडा विकला गेला 'हा' भारतीय कर्णधार title=
Photo Credit: @13harmanpreet/X

Hamanpreet Singh: हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. गेल्या काही वर्षात पाठी पडलेला हा खेळ आता आपल्या देशात फुल फॉर्ममध्ये आला आहे. सध्या हॉकीने भारतीय चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे. भारतीय हॉकी संघाने सर्वाधिक 8 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकण्याचा जागतिक विक्रम केला आहे. अलीकडेच आपल्या भारतीय हॉकी संघाने २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले, हे त्याचे सलग दुसरे पदक होते. हीच कामगिरी लक्षात घेऊन तब्ब्ल 7 वर्षांनंतर यंदा हॉकी इंडिया लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी लिलाव आयोजित करण्यात येत आहे. ज्यामध्ये भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आत्तापर्यंतचा सर्वात महागडा विकला गेला आहे.

किती रुपयांना विकला गेला हरमनप्रीत सिंग? 

हॉकी इंडिया लीग 2024 च्या लिलावात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगला 'सूरमा हॉकी क्लब'ने ७८ लाख रुपयांना विकत घेतले आहे. पहिल्या दिवशी लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीतची किंमत सर्वाधिक लागली आहे. हरमनप्रीत हा एक उत्कृष्ट ड्रॅग-फ्लिकर आहे. तो दबावाच्या परिस्थितीतही  चांगली कामगिरी करू शकतो. भारतीय संघाकडून खेळताना त्याने 234 सामन्यांत 205 गोल केले आहेत. याखेरीज पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या संघाचाही तो महत्त्वाचा भाग होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनला हरवून कांस्यपदक जिंकले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. याशिवाय भारताने ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला होता. भारताने 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

काय म्हणाला हरमनप्रीत सिंग? 

लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर हरमनप्रीत सिंगने आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की, "पंजाब संघाने माझी निवड केल्यामुळे मी खूप उत्साहित आहे. आमच्या संघाचे नाव सुरमा हॉकी क्लब आहे. हॉकी इंडिया लीगचे पुनरागमन होत आहे हे जास्त आनंद देणार आहे. आपल्या तरुणांना त्याचा खेळ दाखवण्याची ही चांगली संधी असून हॉकीचे भविष्य उज्ज्वल आहे." 

 

हॉकी इंडिया लीग 7  वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. याआधी पाच हंगाम झाले आहेत आणि शेवटच्या वेळी 2017 मध्ये कलिंगा लेझर्सने दबंग मुंबईला हरवून विजेतेपद पटकावले होते.