हैदराबाद : इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीचा साखरपुडा झाला आहे. भारतीय टीममध्ये जागा मिळवल्यानंतर २५ वर्षांच्या हनुमा विहारीचा साखरपुडा झाला आहे. हनुमानं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. हनुमानं त्याची मैत्रिण प्रीतिराज येरुवासोबत साखरपुडा केला आहे. हैदराबादमध्ये साखरपुड्याचा सोहळा पार पडला. प्रीतिराज ही व्यवसायानं फॅशन डिझायनर आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये हनुमा विहारी त्याच्या गुडघ्यावर बसून प्रीतिराजला अंगठी घालत आहे. आणि ती हो म्हणाली, असं कॅप्शन हनुमानं या फोटोला दिलं आहे.
विहारीनं त्याच्या पहिल्याच टेस्टमध्ये ५६ रनची खेळी केली होती. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये विहारीला पहिल्या ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विहारीनं आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विहारीनं बॉल सोडण्याचा आणि उसळणारे बॉल खेळण्याच्या सरावाला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी मला संधी मिळाली नाही. त्यामुळे मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. आम्ही पिचवर एक रॅम्प ठेवला होता, ज्यामुळे बॉलला जास्त उसळी मिळेल, असं हनुमा विहारी म्हणाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉलर बाऊन्सर टाकून तुमची परीक्षा घेतात. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांवर गती आणि उसळी जास्त असते. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीनं सराव करावा लागतो. मी ऑस्ट्रेलियात चांगलं प्रदर्शन करीन, असं वक्तव्य विहारीनं केलं आहे.
हनुमा विहारीनं देवधर ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली. भारत ए नं भारत बी वर ४३ रननं विजय मिळवला. हनुमा विहारी या मॅचमध्ये सर्वाधिक ८७ रन केले. ६ डिसेंबरपासून भारताची पहिली टेस्ट ऍडलेडमध्ये होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड ए दौऱ्यामध्ये निवड होईल, असा विश्वास विहारीला आहे.