Happy Birthday Messi : जेव्हा मॅच सुरु असताना लिओनेल मेस्सी टॉयलेटमध्ये अडकतो तेव्हा...

मेस्सी आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करतोय.

Updated: Jun 24, 2021, 08:18 AM IST
Happy Birthday Messi : जेव्हा मॅच सुरु असताना लिओनेल मेस्सी टॉयलेटमध्ये अडकतो तेव्हा...

मुंबई : अनेक विक्रम आणि असंख्य गोल्स नावे असलेला फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीचा आज वाढदिवस आहे. मेस्सी आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करतोय. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सीची गणना केली जाते. अर्जेन्टिना स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बालपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. 

लहानपणापासूनच मेस्सीने त्याच्या खेळाची किमया दाखवली होती. एकदा वयाच्या फुटबॉलच्या एका टूर्नामेंटमध्ये मेस्सीने भाग घेतला होता. दरम्यान फुटबॉलची मॅच सुरु होण्यापूर्वी मेस्सी टॉयलेटमध्ये अडकून पडला होता. टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्याने मेस्सीला बाहेर येणं शक्य नव्हतं. तर दुसरीकडे मेस्सीच्या टीमचा सामना सुरु झाला होता आणि समोरच्या टीमने एक गोलही नोंदवला.

अखेर काही वेळाने टॉयलेटची खिडकी फोडून मेस्सी कसाबसा बाहेर पडला आणि तातडीने मैदानात पोहोचला. तोपर्यंत मॅचचा हाफ टाईम झाला होता. दुसरा हाफ टाईम मेस्सीने मैदानात उतरण्याचं ठरवलं आणि मॅचच्या अखेरीस 3-1 अशा स्कोरने मेस्सीच्या संघाने सामना जिंकला. दुसऱ्या हाफमध्ये हॅटट्रीक मारत मेस्सीने संघाला विजय मिळवून दिला होता.

अशा पद्धतीने मेस्सीच्या खेळाची जादू सुरुच राहिली. त्यानंतर प्रसिद्ध फुटबॉल क्लब बार्सिलोनामध्ये मेस्सीची निवड झाली. तर 2005 मध्ये मेस्सीने अर्जेंटिना टीमतर्फे इंटरनॅशनल डेब्यू केला. सब्स्टिट्यूट प्लेयर म्हणून मेस्सी मैदानात आला असता अवघ्या 47 सेकंदात त्याला माघारी परतावं लागलं होतं. पहिल्याच सामन्यात मेस्सीला रेड कार्ड मिळालं होतं.

सध्या कोपा अमेरिका टूर्नामेंट सुरु असून मेस्सीच्या अर्जेंटिना टीमची कामगिरी उत्तम सुरु आहे. मेस्सी यंदाच्या टूर्नांमेंटमध्ये चिलीविरूद्ध एका गोलची नोंद केली आहे. यंदा मेस्सीची अर्जेंटिना कोपा अमेरिकेचा खिताब जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.