IPL 2024: टॉस फिक्सिंगमध्ये हार्दिक पंड्याचा हात? फाफ डु प्लेसिसने लाईव्ह टीव्हीवर लगावला आरोप?

IPL 2024: गेल्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील टॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून मागील बाजूने नाणं फेकताना दिसतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 16, 2024, 09:06 AM IST
IPL 2024: टॉस फिक्सिंगमध्ये हार्दिक पंड्याचा हात? फाफ डु प्लेसिसने लाईव्ह टीव्हीवर लगावला आरोप? title=

IPL 2024: सोमवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात हैदराबादने बंगळरूचा पराभव केला. मात्र या सामन्यात बंगळूरूचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर मोठा आरोप केला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याच्या टॉसबाबत फाफ डू प्लेसिसमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

टॉसवरून पुन्हा झाला गदारोळ

गेल्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील टॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून मागील बाजूने नाणं फेकताना दिसतोय. यावेळी टॉससाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या मागील बाजूस हे नाणं पडताना दिसतं. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ हे नाणं उचलण्यासाठी माघारी फिरतात. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मॅच रेफरीवर टॉस फिक्सिंगचा आरोप केला.

फाफने कमिंसला इशाऱ्याने सांगितली ही बाब

सोमवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याच्या टॉसवेळी आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिसने हातवारे करत पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडलं. या सामन्यात टॉस होण्याच्या काही सेकंद आधी डु प्लेसिस आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स बोलत होते.

डु प्लेसिस मुंबईत टॉस दरम्यान SRH कर्णधाराला काय घडलं ते सांगत होता. अशातच चाहत्यांकडून असा दावा केला जातोय की, मॅच रेफरीने नाणं उलटे उचलल्याचं फाफने स्पष्टपणे सूचित केलं. इतकंच नाही तर डु प्लेसिसने जे सांगितले ते ऐकून कमिन्स थोडे आश्चर्यचकित दिसून आला.

आरसीबी चाहत्यांचा मुंबईवर गंभीर आरोप

आरसीबी विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी चाहत्यांनी पुन्हा एकदा वानखेडे घटनेबद्दल चर्चा करण्यास सुरुवात केली. आरसीबीच्या चाहत्यांनी बीसीसीआयच्या मॅच रेफ्रीवर नाणे उलटं उचलल्याचा आरोप केला होता. काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झालं.