Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत ऐन मोक्याच्या वेळी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. गट डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रॉसओव्हर फेरीत न्यूझीलंडशी भिडावं लागणार आहे. मात्र आता मिडफिल्डर हार्दिक सिंग दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत हार्दिकनं स्पेन आणि इंग्लंड विरुद्ध चांगली खेळी केली होती. त्याची उणीव वेल्स विरुद्धच्या सामन्यात दिसून आली. या सामन्यात भारताची आक्रमकता कमतरता दिसून आली. मात्र उर्वरित सामन्यात हार्दिक दुखापतीतून सावरण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याऐवजी संघात राजकुमार पालला संधी मिळणार आहे. यावर भावूक होत हार्दिक सिंगनं इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.
"दुर्दैवाने, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे माझे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. मला कधीच अशा प्रकारे मैदान सोडायचे नव्हते, विशेषत: विश्वचषक स्पर्धेत. पण सर्व काही ना काही कारणास्तव घडते. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यातून बाहेर यायला थोडा वेळ लागेल. मला दु:ख होतेय की, मी या विश्वासाची परतफेड करू शकत नाही आणि मैदानात खेळू शकत नाही. पण आमची स्पर्धा अद्याप संपलेली नाही. आता खरोखरच सुरुवात होत आहे! क्रॉसओव्हर फेरीतील सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आपण करून दाखवू या", असं हार्दिक सिंग याने लिहिलं आहे.
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत एकूण चार गट असून त्या प्रत्येक गटातील अव्वल स्थानी असलेले संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. ग्रुप ए मधून ऑस्ट्रेलिया, ग्रुप बी मधून बेल्जियम, ग्रुप सी मधून नेदरलँड आणि ग्रुप डी मधून इंग्लंडची वर्णी उपांत्यपूर्व फेरीत लागली आहे.
बातमी वाचा- Hockey World Cup स्पर्धेत 'या' चार संघांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, भारताचं गणित एका सामन्यावर
चार गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. गट ए मधून अर्जेंटिना आणि फ्रान्स, गट बी मधून जर्मनी आणि कोरिया, गट सी मधून मलेशिया आणि न्यूझीलंड, गट डी मधून भारत आणि स्पेन या आठ संघाना क्रॉसओव्हर सामना खेळावा लागणार आहे.