T20 World Cup Prize Money Distribution: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर मैदानात सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान एकही सामना न हारता टी-20 वर्ल्डकप जिंकणारा भारत पहिला संघ ठरला. या विजयानंतर बीसीसीयआनेही लगेच संघाला 125 कोटींचं बक्षीस जाहीर करुन टाकलं. यानंतर अनेकांना हे पैसे फक्त खेळाडूंमध्येच वाटले जाणार का? असा प्रश्न पडला होता. पण तसं नसून त्याचं उत्तर अखेर सापडंल आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपसाठी एकूण 42 जण गेले होते. यामध्ये 15 खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ, राखीव खेळाडू यांचाही समावेश होता. बीसीसीआयने जाहीर केलेले 125 कोटी फक्त खेळाडूंमध्ये वाटले जाणार नसून स्टाफ, राखीव आणि इतरांनाही दिले जाणार आहेत. म्हणजेच सर्व 42 जणांमध्ये बक्षिसाची रक्कम वाटली जाणार आहे. पण ही रक्कम वाटताना प्रत्येकाला त्याच्या भूमिकेनुसार पैसे दिले जाणार आहेत.
इंडियन एक्स्प्रेसन दिलेल्या वृत्तानुसार, संघातील सर्व 15 सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी दिले जाणार आहेत. यामध्ये एकही सामना न खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला 5 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
द्रविडच्या कोचिंग स्टाफबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश आहे, त्यांना प्रत्येकी 2.5 कोटी दिले जाणार आहे. तसंच निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यासह निवड समितीच्या सदस्यांना प्रत्येकी 1 कोटींचे वितरण केले जाईल.
सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये तीन फिजिओथेरपिस्ट, तीन थ्रोडाउन विशेषज्ञ, दोन मालिश करणारे आणि सामर्थ्य व कंडिशनिंग प्रशिक्षक यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला त्यांना बीसीसीआयकडून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेबद्दल सांगण्यात आलं असून, त्यांनी इनवॉइस दाखल करण्यासही सांगितलं आहे".
बीसीसीआयच्या निवड समितीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघासह चार राखीव खेळाडूंचीही नावे दिली आहेत. यात रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांचा समावेश होता. त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं होतं की, "जिथपर्यंत 125 कोटींचा प्रश्न आहे, ते खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक आणि निवडकर्ते यांच्यातही वाटले जाणार आहेत". दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी भारतीय संघातील खेळाडूंना 11 कोटींच बक्षीस जाहीर केलं आहे.