मुंबई : २ वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईनं यावर्षीची आयपीएल जिंकली. चेन्नईची आयपीएल जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबईच्या रेकॉर्डशी चेन्नईनं बरोबरी केली आहे. ११ वर्षांमधली ही सगळ्यात चुरशीची आयपीएल म्हणावी लागेल. कारण शेवटच्या मॅचनंतरच प्ले ऑफमध्ये कोणती टीम खेळणार हे निश्चित झालं. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान या टीम प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या. फायनल जिंकल्यामुळे चेन्नईला २० कोटी रुपये बक्षीस मिळालं. तर हैदराबादला १२.५ कोटी, कोलकाता आणि राजस्थानला ८.७५ कोटी रुपये मिळाले.
खेळाडूंना आणि टीमना आयपीएलमध्ये किती पैसे मिळाले हे सगळीकडे प्रसिद्ध झालं असलं तरी प्रशिक्षकांना किती पैसे देण्यात आले याबाबत मात्र कुठेही माहिती देण्यात आलेली नाही. पण टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार बंगळुरूचा प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरीला सर्वाधिक मानधन देण्यात आलं. व्हिटोरीनंतर बंगळुरूचाच बॉलिंग प्रशिक्षक आशिष नेहराला ४ कोटी रुपये देण्यात आले. दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉटिंगला ३.७ कोटी, चेन्नईचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगला ३.२ कोटी रुपये, पंजाबचा प्रशिक्षक विरेंद्र सेहवागला ३ कोटी रुपये, राजस्थानचा सल्लागार शेन वॉर्नला २.७ कोटी रुपये, कोलकात्याचा प्रशिक्षक जॅक कॅलीस आणि मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेला २.२५ कोटी रुपये. हैदराबादच्या लक्ष्मण आणि टॉम मुडीला २ कोटी रुपये, बंगळुरूचा बॅटिंग प्रशिक्षक गॅरी कर्स्टनला २ कोटी आणि मुंबईचा बॉलिंग प्रशिक्षक लसिथ मलिंगाला १.५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं.