T20 World Cup : कॅप्टन रोहितला धक्काबुक्की करणं तंझीमला पडलं महागात, ICC ने कारवाई करत शिकवला धडा

ICC imposed fine on tanzim hasan sakib : नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आयसीसीने बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याच्यावर कारवाई केली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 19, 2024, 03:40 PM IST
T20 World Cup : कॅप्टन रोहितला धक्काबुक्की करणं तंझीमला पडलं महागात, ICC ने कारवाई करत शिकवला धडा title=
ICC imposed fine on tanzim hasan sakib

Tanzim Hasan Sakib vs Rohit Paudel : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या 37 व्या सामना बांगलादेश आणि नेपाळ या दोन संघात (Bangladesh vs Nepal) खेळवला गेला होता. नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) आणि बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब (Tanzim Hasan Sakib) यांच्यात राडा झाला होता. दोन्ही खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता आयसीसीने या प्रकरणात लक्ष घातलं असून बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन केल्याबद्दल तंजीमवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आलीये.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने (ICC) क्रिकेट खेळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई केली असून मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल तंजीमवर कारवाई करण्यात आली आहे, असं आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

नेमकं काय झालं होतं?

बांगलादेशचा गोलंदाजी सुरू असताना नेपाळच्या संघावर दडपण आलं होतं. तंझीम हसन शाकिब याने बांगलादेशसाठी तिसरी ओव्हर केली. या ओव्हरच्या पहिल्या पाच बॉलवर त्याने एकही रन दिला नाही. त्यामुळे सहावा बॉल महत्त्वाचा होता. अखेरचा बॉल नेपाळला खेळून काढायचा होता. त्यावेळी नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल स्ट्राईकवर होता. तिसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर रोहित पौडेल याची विकेट मिळावी त्यासाठी तंझीमने उत्तम लेंथ बॉल टाकला. मात्र, अखेरच्या बॉलवर विकेट मिळाली नाही. कॅप्टन रोहितने बॉल डिफेन्ड केला. त्यामुळे तंझीम चांगलाच भडकला होता.

बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याने नेपाळच्या कॅप्टनला थेट खुन्नस दिली. दोघंही आमने सामने आले अन् बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितशी भांडताना तंझीमने रोहितला धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं. त्यानंतर अंपायर आणि इतर खेळाडूंनी दोघांना बाजूला घेतलं अन् वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पुढच्या ओव्हरमध्ये तंझीमने रोहितची विकेट काढली अन् भन्नाट सेलिब्रेशन केलं.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी बांगलादेशची टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), तस्कीन अहमद (उपकर्णधार), लिटॉन दास, सौम्या सरकार, तंजिद हसन, शाकिब अल हसन, तॉहिद हृदोय, महमूदुल्लाह, जाकेर अली, तनवीर इस्लाम, मेहदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शॉरिफुल इस्लाम आणि तंजिम हसन.