दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. या पराभवानंतर आयसीसी क्रमवारीत भारताचे २ अंक कमी झाले आहेत. अंक कमी झाले असले तरी भारतीय टीम दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. आयसीसीच्या टी-२० क्रिकेटच्या यादीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीमध्ये भारताचा स्पिनर कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिसऱ्या टी-२०मध्ये कुलदीपनं ४ ओव्हरमध्ये २६ रन देऊन २ विकेट घेतल्या होत्या. बॉलरच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादवचा जोडीदार असलेला स्पिनर युझवेंद्र चहलची ६ क्रमांकानी घसरण झाली आहे. चहल या यादीत १७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भुवनेश्वर कुमार १८व्या स्थानवर कायम आहे.
बॅट्समनच्या यादीमध्ये रोहित शर्मा तीन क्रम वरती तर केएल राहुल तीन क्रम खाली आला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. रोहित शर्मा सातव्या आणि केएल राहुल दहाव्या क्रमांकावर तर शिखर धवन ११व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये विश्रांती घेतलेल्या विराट कोहलीच्या क्रमवारीत चार क्रमांकांची घसरण झाली आहे. विराट झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मसकादझासोबत १९व्या क्रमांकावर आहे.
कृणाल पांड्यानं टी-२० क्रमवारीत ३९ स्थानांची मुसंडी मारली आहे. कृणाल त्याची सर्वोत्तम ५८व्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं एक पायदान चढून १२वा तर रॉस टेलरनं ७ पायदान चढून ५१ वा आणि टीम सायफर्टनं ८७ स्थानांची उडी मारून ८३वा क्रमांक गाठला आहे.