ICC Test Rankings मध्ये ऋषभ पंतने सर्वांना टाकलं मागे

 ऋषभ पंतची मोठी झेप

Updated: Jan 20, 2021, 03:46 PM IST
ICC Test Rankings मध्ये ऋषभ पंतने सर्वांना टाकलं मागे

मुंबई : आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारतीय संघाच्या विजयानंतर बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान ऋषभ पंतचा वनडे आणि टी-२० संघात समावेश नव्हता. अगदी कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठीही त्याला वगळण्यात आले, परंतु संधी मिळताच त्याने आपला रंग दाखविला. तिसर्‍या कसोटी सामन्याचा चौथा डाव असो किंवा चौथ्या कसोटी सामन्यातील शेवटचा डाव असो, पंतने भारतासाठी एक अद्भुत कामगिरी करुन दाखवली, जे त्याच्या आधी कोणत्याही विकेटकीपरने केले नव्हते. याचा फायदा त्याला बुधवारी 20 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झाला आहे.

ऋषभ पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा संघाचा कर्णधार क्विंटन डिकॉकला मागे टाकले आहे. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऋषभ पंतने 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. या क्रमांकापर्यंत कोणताही विकेटकीपर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नाही. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकॉक 15 व्या स्थानावर आहे.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये मुकलेला विराट कोहली दुसर्‍या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यानंतर चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानावर पोहोचला आहे. या व्यतिरिक्त अजिंक्य रहाणे दोन क्रमांकांनी खाली घसरला आहे. गोलंदाजीमध्ये जोश हेजलवुड, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक स्थानाचा फायदा झाला आहे. एक सामना न खेळल्यामुळे रवींद्र जडेजा एक क्रमांक खाली आला आहे. आर अश्विन अष्टपैलू क्रमवारीत एका स्थानाने वर आला आहे.

ऋषभ पंत सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे. त्याने कसोटी क्रमवारीत रेटिंगच्या गुणांसह भारताच्या सर्व विकेटकीपरला मागे टाकले आहे. ऋषभ पंतचे सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 691 गुण आहेत, तर महेंद्रसिंग धोनीने कारकीर्दीत सर्वाधिक 662 गुण मिळवले आहेत.