श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बॉल टेम्परिंगचा आरोप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणी कठोर शिक्षा देण्यासाठी लॉबिंग करणार आहे. 

Updated: Jun 18, 2018, 11:46 AM IST
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बॉल टेम्परिंगचा आरोप

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणी कठोर शिक्षा देण्यासाठी लॉबिंग करणार आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप लगावण्यात आलाय. आयसीसी या प्रकारच्या अपराधांची लेव्हल दोन वरुन तीन करण्याचा विचार करतेय. आतापर्यंत लेव्हल दोन पर्यंतच्या अपराधांमध्ये एक टेस्ट अथवा दोन वनडेंसाठी बंदी घातली जात होती. मात्र केलेला अपराध हा लेव्हल तीनमधील असेल तर त्या खेळाडूवर चार टेस्ट अथवा आठ वनडेंसाठी बंदी घालता येते. 

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी क्रिकइन्फोशी बातचीत करताना सांगितले, क्रिकेट समितीच्या मते बॉलशी केलेली छेडछाड हा गुन्हा आहे. यामुळे खिलाडूवृत्तीला ठेस पोहोचते. सामन्यादरम्यान चेंडूला पॉलिश करणे अथवा चेंडूवर कोणत्याही प्रकारची कृत्रिम वस्तू लावणे गैर आहे. 

चंडीमल म्हणतो, मी निर्दोष आहे

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलने स्वीटचा वापर करत बॉल टेम्परिंगचे आरोप फेटाळून लावलेत. आयसीसीने सांगितलेय, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याला सुनावणीचा सामना करावा लागेल.