मुंबई : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचीच दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. मँचेस्टर येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात पावसामुळे व्यत्य आला. अखेर प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडची धावसंख्या २११ धावांवर पोहोचलेली असतानाच सामना थांबवण्यात आला.
४६.१ व्या षटकाध्ये हा सामना थांबवण्यात आला. अखेर बुधवारी हा सामना पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं. पण, तरीही सामन्यावर असणारं पावसाचं संकट कायम आहे.
weather.comच्या माहितीनुसार मँचेस्टरमध्ये सकाळपासूनच पावसाच्या ढगांचं अच्छादन असणार आहे. मधल्या काही वेळात ढगांचं हे सावट विरळ झालेलं असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी या दोन्ही संघांचं भविष्य खऱ्या अर्थाने पावसाच्याच हातात आहे, असं म्हणायला हरकत नाही.
४६ व्या षटकापासूनच सुरु होणार सामना
मंगळवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना ४६.१ व्या षटकात थांबवण्यात आला होता. ज्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या पाच गडी बाद २११ धावा इतकी होती. हाच सामना बुधवारी पुन्हा सुरु होईल. मंगळवारी खेळ ज्या षटकात, ज्या चेंडूवर थांवण्यात आला होता, तेथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे.
सामना पूर्ण झाला नाही तर..
आयसीसी विश्वचषकामध्ये बादफेरीत रिजव्ह डेचाही पर्याय आहे. या नियमानुसार सामन्याच्या निर्धारित दिवशी तो सामना पूर्ण न झाल्यास पुढच्या दिवशी त्याच स्थितीत सामन्याची पुन्हा सुरुवात केली जाते जेथे तो थांबवण्यात आला होता. १९९९ मधील विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच अशीच परिस्थिती उदभवली होती.
२० षटकांपर्य़ंत फलंदाजी
सामना पूर्ण होण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी २० षटकांपर्यंत फलंदाजी करण्याची गरज आहे. जर असं झाली नाही तर, भारतीय संघ थेट अंतिम फेरीत दाखल होईल. कारण, गुणतालिकेत हा संघ न्यूझीलंडच्या पुढे, पहिल्या स्थानावर आहे.