ICC World Cup 2023 Australia vs South Africa : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला (Australia) सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) ऑस्ट्रेलियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट गमावत 311 धावा केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाच संघ 40 व्या षटकात केवळ 177 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाला तब्बल 134 धावांनी पराभव स्विकारावा लागला. विश्वचषचक स्पर्धेच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरलाय. याआधी पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली होती.
ऑस्ट्रेलियाचा लाजीरवाणा पराभव
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा हा विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. लखनऊमध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे हिरो ठरले ते स्टार फलंदाज क्विंटन डिकॉक आणि वेगवागन गोलंदाज कगिसो रबाडा.
विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. विजयाची ही मालिका दक्षिण आफ्रिकने विश्वचषक स्पर्धेतही कायम ठेवली. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडिअममध्ये दोन बलाढ्य संघांचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. हा सामना चुरशीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी विजय मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीत ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत ठरला.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे हिरो
विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती घोषणा करणाऱ्या क्विंटन डिकॉकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकलं. क्विंटन डिकॉकचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे. डिकॉकने 109 धावांची शानदार खेळी केली. यात त्याने 5 सिक्स आणि 8 चौकारांची बरसात केली. त्यानंतर आलेल्या मारक्रमनेही तुफानी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीनशे पार नेली. गोलंदाजीबरोबरच ऑस्ट्रेलियाचं क्षेत्ररक्षणही गचाळ झालं. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तब्बल सहा झेल सोडले. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या
रबाडाची भेदक गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची मेहनत गोलंदाजांनीही वाया जाऊ दिली नाही. कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर पुरती ढेपाळली. कागिसोने अवघ्या 33 धावात तीन विकेट घेतल्या. तर यानसनने 54 धावा देत दोन विकेट घेतल्या. केशव महाराजने 30 धावा देत दोन विकटे घेतल्या. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.