एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'नंबर वन' शुभमन गिलच्या जर्सीचा नंबर 77 का? खूपच रंजक आहे कहाणी

Shubman Gill : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत शुभमनने मोडीत काढली आहे. शुभमनचा फॅन फॉलोईंगही जबदस्त आहे, अशातच शुभमन वापरत असलेल्या 77 नंबरच्या जर्सीबद्दल चाहत्यांमध्ये उत्कुसता वाढलीय. 

राजीव कासले | Updated: Nov 8, 2023, 08:09 PM IST
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'नंबर वन' शुभमन गिलच्या जर्सीचा नंबर 77 का? खूपच रंजक आहे कहाणी title=

Shubman Gill Jersey : भारताचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. 2023  हे वर्ष शुभमन गिलसाठी (Shubman Gill) लाभदायक ठरलं आहे. या वर्षात शुभमन गिलने तब्बल 1449 धावा केल्यात. यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतात सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतही शुभमन गिलच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघतायत. आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यात शुभमन गिलने 219 धावा केल्या आहेत. याच कामगिरीच्या जोरावर शुभमन गिलने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही (ICC ODI Ranking) मोठी झेप घेतली आहे. शुभमन गिलने पाकिस्तानचा कर्मधार बाबर आझमची (Babar Azam) तब्बल 905 दिवसांची बादशाहत मोडीत काढत अव्वल स्थान पटकावलं आहे.  शुभमन गिलच्या खात्यात 830 पॉईंट आहे. तर बाबर आझमच्या खात्यात 824 पॉईंट जमा आहेत.

शुभमन गिलची क्रिकेट कारकिर्द
24 वर्षांच्या युवा फलंदाजाने अगदी कमी कालावधीत टीम इंडियात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. शुभमनने 31 जानेवारी 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. अवघ्या चार वर्षात शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहली हा शुभमन गिलचा आवडता खेळाडू तर सचिन तेंडुलकर शुभमनचा आदर्श खेळाडू असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अवघ्या 24 व्या वर्षात शुभमनची फॅन फॉलोईंग लाखोच्या घरात आहे. शुभमनशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. 

शुभमनच्या जर्सीची कहाणी
चाहत्यांना सर्वात जास्त उत्सुकता आहे ती शुभमन गिल वापरत असलेल्या जर्सीची (Shubman Gill Jersey). टीम इंडियात शुभमन गिल 77 नंबरची जर्सी वापरतो (Jersey Number 77). पण हाच नंबर शुभमन गिलने का निवडला, यामागे नेमकं काय गुपित आहे, याची उत्सुकता शुभमन गिलला आहे. याबाबत गिलने एका मुलाखतीत माहिीत दिली होती. शुभमन गिलला अंडर 19 विश्वचषकात खेळताना सात नंबरची जर्सी हवी होती. सात नंबर हा शुभमनचा लकी आकडा आहे. पण सात नंबर उपलब्ध नसल्याने शुभमने आणखी एक सात जोडला आणि 77 नंबर निवडला. टीम इंडियात एन्ट्री झाल्यावरही शुभमन गिलने 77 हाच नंबर कायम ठेवला. 

टीम इंडियात भारताची सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनीच्या जर्सीचा नंबर सात होता. धोनी निवृत्त झाल्यावर बीसीसीआयने धोनीचा सन्मान म्हणून तो वापरत असलेल्या सात नंबरची जर्सीसुद्धा रिटायर्ड केली. याआधी सचिन तेंडुलकर वापरत असलेल्या दहा नंबरची जर्सीही रिटायर्ड करण्यात आली होती. 

शुभमन गिल भारतासाठी आतापर्यंत 18 कसोटी, 41 एकदिवसीय आणि 11 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत शुभमनने 966 धावा केल्या असून यात 2 शतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2136 धावा जमा आहेत. यात 6 शतकांचा समावेश आहे. तर 11 टी20 सामन्यात शुभमनने 304 धावा केल्या आहेत.