KL Rahul: मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरूद्ध टीम इंडिया यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने दारूण पराभव झाला. पोर्ट एलिझाबेथ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने 212 चं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला दिलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 42.3 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा पराभव केला.
दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार के.एल राहुलने फलंदाजांवर खापर फोडलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यानंतर KL Rahul काय म्हणाला हे पाहूयात.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने सामन्याच्या पोस्ट प्रेझेंटेशन दरम्यान सांगितलं की, जर साई आणि त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली खेळी केली असती तर दक्षिण आफ्रिकेसोबत चांगलं लक्ष्य ठेवता आलं असतं.
के.एल राहुल म्हणाला की, “टॉस गमावणं आमच्यासाठी वाईट होतं कारण पहिल्या डावात फलंदाजी करणं कठीण होतं. जर मी किंवा साईने शेवटपर्यंत खेळून शतक ठोकलं असतं आणि आम्ही 250 रन्स केले असते तर तो आव्हानात्मक स्कोर ठरला असता. दुसऱ्या डावात पहिल्या 10 ओव्हर्समध्ये गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करून आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू.”
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला संपूर्ण 50 ओव्हर्स फलंदाजी करता आली नाही. यावेळी 46.2 ओव्हर्समध्ये 211 रन्स करून सर्वबाद झाली. कर्णधार केएल राहुल 56 आणि युवा ओपनर साई सुदर्शन 62 रन्स यांच्याशिवाय एकाही फलंदाजाने फलंदाजी केली नाही. प्रत्युत्तरात टोनी डिझोर्झीचे शतक ठोकलं. शिवाय रीझा हेंड्रिक्सचं अर्धशतक यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सामना 8 विकेट्स राखून जिंकला.