...तर विराट २०२० मध्येच मोडणार सचिनचा विक्रम!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं

Updated: Mar 6, 2019, 04:05 PM IST
...तर विराट २०२० मध्येच मोडणार सचिनचा विक्रम! title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं. विराट कोहलीनं या मॅचमध्ये १२० बॉलमध्ये ११६ रनची खेळी केली. वनडे क्रिकेटमधलं विराटचं हे ४०वं शतक होतं. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं केली आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनचं रेकॉर्ड मोडण्यापासून विराट आता १० शतकं दूर आहे. पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत विराटला सचिनचं हे रेकॉर्ड मोडता येऊ शकतं.

विराट कोहलीनं २२४ मॅच आणि २१६ इनिंगमध्ये ४० शतकं केली आहेत. म्हणजेच सरासरी बघितली तर विराटनं प्रत्येक ६ मॅच (५.६ मॅच) नंतर एक शतक झळकावलं आहे. विराटनं २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांमध्ये प्रत्येकी ६-६ शतकं केली आहेत. विराटनं २०१७ साली २६ आणि २०१८ साली फक्त १४ मॅच खेळल्या. म्हणजेच मागच्या २ वर्षांमध्ये विराटनं ४० वनडेमध्ये १२ शतकं केली आहेत.

२०१८ च्या शेवटी विराटच्या नावावर वनडेमध्ये ३८ शतकं होती. २०१९च्या सुरुवातीला विराट सचिनच्या ४९ शतकांच्या रेकॉर्डच्या ११ शतक पिछाडीवर होता. पण या वर्षात आत्तापर्यंत विराटनं २ शतकं झळकावली आहेत. याच वेगानं विराट शतक लगावत राहिला, तर २०२० सालच्या शेवटापर्यंत सचिनचं सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड तुटेल.

वनडेमध्ये सर्वाधिक शतक करणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर- ४९ शतकं

विराट कोहली- ४० शतकं

रिकी पाँटिंग- ३० शतकं

सनथ जयसूर्या- २८ शतकं

हाशीम आमला- २७ शतकं

पाँटिंगचं रेकॉर्ड याचवर्षी तुटणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक १०० शतकांच्या रेकॉर्डची नोंद आहे. या यादीमध्ये रिकी पाँटिंग ७१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट ६५ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर विराटला यावर्षी टेस्ट आणि वनडे मिळून ७ शतकं करता आली तर तो पाँटिंगच्या पुढे जाईल. २०१८ साली विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ शतकं केली होती.

द्रविडचं रेकॉर्डही तुटणार

विराट कोहलीनं २२४ मॅचमध्ये ५९.७३ च्या सरासरीनं १०,६९३ रन केले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दहाव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सौरव गांगुली (११,३६३ रन) आठव्या आणि राहुल द्रविड (१०,८८९ रन) नवव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं आता १९७ रन केल्यावर तो राहुल द्रविडच्या पुढे जाईल.