जोहान्सबर्ग : वन-डे सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. वन-डे सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडिया टी-२० सीरिज जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
आपल्या विजयाची घोडदौड सुरु ठेवण्यासाठी टीम इंडियाला टी-२० सीरिज जिंकायची आहे. रविवार पासुन सुरु होणाऱ्या टी-२० सीरिजमध्ये सुरेश रैनाला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. वर्षभरानंतर संधी देण्यात आल्याने सुरेश रैनावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या स्पिनर्सची जोडी आफ्रिकन टीमची परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आफ्रिकन मैदानात टीम इंडिया आणि टी-२० मॅच संदर्भात काही खास आठवणी जोडल्या आहेत. टीम इंडियाने पहिली टी-२० मॅच २००६ साली दक्षिण आफ्रिकेतच खेळली होती आणि वर्षभरानंतर टीम इंडियाने आफ्रिकेतच पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.
रविवार पासुन सुरु होणाऱ्या टी-२० सीरिजसाठी सुरेश रैना, केएल राहुल आणि जयदेव उनादकट यांना संधी देण्यात आली आहे. सुरेश रैनाला अंतिम ११मध्ये संधी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. रैनाने २०१५ नंतर वन-डे मॅच खेळली नाहीये आणि वर्षभरापूर्वी इंग्लंड विरोधात शेवटची टी-२० सीरिज खेळली होती. सुरेश रैनाने आतापर्यंत तीन मॅचेसमध्ये एक हाफसेंच्युरी केली होती आणि एकूण १०४ रन्स केले आहेत.
यासोबतच जयदेव उनादकट याच्यावरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड विरोधातील सीरिजपासून आतापर्यंत टीम इंडियाने सहा टी-२० मॅचेसपैकी चार मॅचेसमध्ये उनादकटला संधी देण्यात आली. जयदेव उनादकट आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला ११.५ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलं.
मॅच संध्याकाळी सहा वाजता सुरु होणार आहे. मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण सोनी टेन१ आणि सोनी टेन३ वर होणार आहे. इंटरनेटवरही मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिववर पहायला मिळेल.