Ind vs Eng : भारत विरुद्ध खेळल्या जाणार्या दुसर्या वनडे सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झालेला कर्णधार इऑन मॉर्गन या मालिकेतून बाहेर आला आहे. या मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी रंगणार आहे. आता विकेटकीपर जोस बटलर उर्वरित सामन्यांमध्ये कर्णधार असणार आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंड संघाचा कर्णधार मॉर्गनच्या हाताला दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठा व बोटाला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे हाताला ४ टाके लागले. सामना संपल्यानंतर मॉर्गनने म्हटले होते की, याक्षणी तो काही बोलू शकत नाही परंतु किमान 24 तास थांबू इच्छितो. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कर्णधाराला झालेल्या दुखापतीविषयी माहिती देताना तो या सीरीजमधून बाहेर झाला आहे.
ट्विटरवरील पोस्टमध्ये इंग्लंड क्रिकेटने लिहिले आहे की, "दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत, एक खेळाडू पदार्पण करणार आहे आणि दुसर्या खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे." लियाम लिविंग्स्टोन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. याविषयी बोर्डाने माहिती दिली आणि सांगितले की टी-२० खेळणारा हा खेळाडू पहिल्यांदाच वनडे मालिकेत खेळणार आहे.
इयन मॉर्गनबरोबर फलंदाज सॅम बिलिंग्सही पहिल्या सामन्यादरम्यान जखमी झाला होता. बिलिंग्जची दुखापतही खूप गंभीर आहे आणि मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमधूनही तो बाहेर झाला आहे. हे दोन्ही खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार का याबाबत ही संशय आहे.